देशात ५जी सेवा अधिकृतरित्या सुरु झाली आहे. एअरटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G Network लाँच केल्या केल्याच देशभरातील आठ शहरांमध्ये ५जी सेवा सुरु केली आहे. पूर्ण देशभरात ही सेवा मिळण्यासाठी काही काळ लागणार आहे. गावागावात ५जी ची रेंज येण्यासाठी २०२४ उजाडणार आहे. असे असताना आता एअरटेल, रिलायन्स जिओच्या गोटात खळबळ उडविणारी बातमी येत आहे.
सरकारी कंपनी जी आजवर ४जी लाँच करू शकली नाही, ती आता 5G मध्ये उतरणार आहे. गावागावात नेटवर्क असलेली बीएसएनएल 5G सेवा देणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या ग्राहकांना आता फार वेळ वाट पहावी लागणार नाही. BSNL ची 5G सर्व्हिस 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. यावरून टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. याची घोषणा इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये करण्यात आली आहे.
बीएसएनएल पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ५जी सेवा लाँच करेल. यामुळे तीन खासगी कंपन्या आणि एक सरकारी कंपनी असे चार कंपन्यांमधील चांगल्या स्पर्धेचे एक स्वस्त नेटवर्क तयार होईल, असे वैष्णव यांनी म्हटले आहे.
बीएसएनएल आताकुठे नेटवर्कवर 4G लाँच करत असताना पुढील वर्षी ५जीचे लक्ष्य कसे साध्य करू शकेल, असे विचारले असता, वैष्णव म्हणाले की 4G वरून 5G ला जाणे खूप कठीण नाही. या कालावधीत ते साध्य केले जाऊ शकते. BSNL चे 5G नेटवर्क नॉन-स्टँडअलोन आर्किटेक्चरवर आधारित असेल. यामध्ये ऑपरेटर तुलनेने कमी गुंतवणुकीसह त्यांच्या विद्यमान नेटवर्क पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करू शकतात, असे ते म्हणाले.
५जी बाबत बोलताना वैष्णव यांनी पुढील सहा महिन्यांत २०० शहरांत ५जी सेवा पोहोचणार असल्याचे आश्वासन दिले. पुढील दोन वर्षांत देशातील ८० ते ९० टक्के भागात ५जी सेवा मिळेल. ५जी सेवा ही परवडणारी देखील असेल, असे ते म्हणाले.
IMC 2022 मध्ये Airtel चा 5G स्पीड 300Mbps वर जात होता. एअरटेलची 5G सेवा 8 शहरांमध्ये प्रथम दिली जात आहे. सध्या Vi 5G च्या रोलआउटबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एअरटेलने दिल्ली, वाराणसी, मुंबई, बंगळूरू, सिलिगुडी, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आजपासून ५जी सेवा सुरु केली आहे.