उस्मानाबाद, दि. 1- राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यामागे समाज दुखावला जाईल, अशी भावना नव्हती. त्याबद्दल आरोग्यमंत्री सावंत यांनी स्पष्टीकरणही दिले होते. परंतु सुरेश पाटील यांनी पुन्हा तोच विषय काढत भर चौकात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मारण्याची भाषा वापरली. त्यांचे हे भाषण म्हणजे संपलेल्या वादाला पुन्हा खतपाणी घालून मराठा समाजाला भडकावणारे असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा सेनेचे जिल्हा चिटणीस आनंद पाटील यांनी व्यक्त केले.
सुरेश पाटील यांनी काही काळ तेरणा कारखाना मिळण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु त्यांची तेवढी पात्रता नसल्यामुळे त्यांना तो मिळाला नाही. परंतु तेरणा कारखाना तानाजी सावंत यांना मिळाला. त्यामुळे एस. पी. शुगर्स कारखाना बंद पडण्याची भीती त्यांच्या मनात आहे. तसेच मराठा समाजासाठी तानाजी सावंत यांचे योगदान मोठे व बहुमुल्य आहे. त्या तुलनेत सुरेश पाटील यांचे स्वतःचे मराठा समाजासाठी कसलेही योगदान नाही. केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांना खूश करण्यासाठी आरोग्यमंत्री सावंत यांच्यावर त्यांनी टीका केली. या टिकेमुळे स्वतःच्या पक्षातील नेते खूश तर झालेच नाहीत. उलट पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कानपिचक्या घेतल्या. त्यामुळे सुरेश पाटील यांनी यापुढील काळात भानावर राहून बोलावे. अन्यथा येत्या काळात शिंदे गटातील युवा सेना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा आनंद पाटील यांनी दिला.