दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान मिळाले आहे. या मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलात करण्याचे काम महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता येथील असंख्य उभ्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गेल्या काही दिवसात दसरा मेळाव्यावरुन मोठा वाद सुरू आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणे हा उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्कचे मैदान देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. दुसऱ्या बाजूला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून केली जाणारी तयारी आता वादात सापडली आहे.
प्रकरण दडपण्याचे काम
मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंगव्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलात करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेने येथील असंख्य उभ्या झाडांची कत्तल केली. याबाबत प्रत्यक्ष स्थळी जाऊन हरकत घेतल्यानंतर तोडलेली झाडे व माती शेकडो डंपरमधून इतरत्र नेऊन प्रकरण दडपण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे.
उथळ कार्यक्रमांना परवानगी नको
मुंबई विद्यापीठाची जागा हि विद्यार्थ्यांसाठी असून येथे राजकीय गटाच्या कार्यक्रमासाठी पार्किंगची व्यवस्था करणे उचित होणार नाही, असे म्हणत विद्यार्थ्यांनी देखील यास विरोध केला आहे. तसे केल्यास भविष्यात विद्यापीठाची जागा अशा उथळ कार्यक्रमांना देण्याचा पायंडा पडण्याची शक्यता आहे.
एकही वाहन शिरू देणार नाही
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यास मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. विद्यापीठात सुरू असलेली झाडांची कत्तल आणि पार्किंग व्यवस्थेचे काम तात्काळ थांबविण्यात यावे अन्यथा दसऱ्याच्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात एकही वाहन शिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅड. अमोल मातेले यांनी दिला आहे.