मध्यरात्रीपासून मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक भागात पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा कायम राहील. राज्याच्या अनेक भागात रिमझीम सरी कोसळताना पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान खात्याने गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच येत्या 17 आणि 18 तारखेला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्यासह इतर राज्यांतही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सातारा
या जिल्ह्यांत येलो अलर्ट
ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा. चंद्रपूर, गडचिरोली
विजांसह पावसाचा इशारा
नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, गोंदिया
महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा
दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
ऑरेंज आणि यलो अलर्ट
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज मराठवाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अनेक भागात कोसळधार
दरम्यान, राज्यातील अनेक भागात दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. काल शिर्डीतील राहता, कोपरगाव, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस झाला. तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत.
मुंबईत पावसाची बॅटिंग
मुंबईत गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल (सोमवारी) दिवसभर मुंबईत पावसाच्या रिमझीम सरी कोसळत होत्या. तसेच, मध्यरात्रीही पावसाची उघडझीप सुरू होती. अशातच गेल्या तासाभरापासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून संपूर्ण मुंबई शहरात जोरदार पाऊस सुरू आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. काही गाड्या सबवेमध्ये अडकल्या असून काही गाड्या साचलेल्या पाण्यामुळे बंद पडल्या आहेत.

