Advertisement

जे खळांची  व्यंकटी सांडो

प्रजापत्र | Tuesday, 20/07/2021
बातमी शेअर करा

 आज आषाढी एकादशी  उभ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठलाचा आज उत्सव. विठ्ठल म्हणजे महाराष्ट्रासाठी केवळ देव नाही तर विठ्ठल समस्त मानव जातीच्या जगण्याचं सूत्र आहे. खर्‍याअर्थाने ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया," ची संकल्पना म्हणजे विठ्ठल. या महाराष्ट्राला जाती पातीच्या, वर्णद्वेषाच्या, लहान - थोराच्या भावनेच्या पलिकडे जाऊन खर्‍या अर्थाने ज्या विचाराने माणूसपण शिकवलं तो विचार म्हणजे विठ्ठल. विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होत ज्या संत परंपरेने महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला. आणि त्या विचाराने सारे ‘भेदाभेद’  विलीन व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली गेली त्या परंपरेचा  उत्सव म्हणजे विठ्ठल. म्हणूनच आषाढी एकादशीकडे कोणते कर्मकांड म्हणून पाहिले जात नाही. तर आषाढी एकादशी हा उत्सव सामान्यांच्या जगण्यातला आहे.

       विठ्ठलालाच जगण्याचं सर्वस्व मानून ज्या संतांनी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये समतेच्या, स्वातंत्र्याच्या बिजाची पेरणी केली. त्याच संतांनी महाराष्ट्राच्या मातीत माणुसकी पेरण्याचे काम केले. आज संतांनी जे बिजारोपण केले होते त्याचे अंकुर जपण्याची जबाबदारी समाजावर आहे. कोरोनामुळे भलेही विठ्ठलाच्या दर्शनाला जाणे प्रत्येकाला शक्य नसेल पण विठ्ठल देखील आपल्या भक्ताकडून या भेटीची अपेक्षा नेहमीच करतो असे नाही. जसे ‘जाता पंढरीसी सुख वाटे जिवा’ असे सांगितले गेले आहे अगदी तसेच ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असे म्हणून आपल्या कर्मातच विठ्ठलाला पाहण्याची शिकवण संतांनी दिलेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर भलेही कोणत्याच वार्‍या आज पंढरीत पोहोचणार नाहीत. परंतु आपल्या कर्मामध्ये ईश्‍वर शोधायचा असेल तर खर्‍या अर्थाने आपली प्रत्येक कृती ईश्‍वरी कशी असेल हे पाहण्याची जबाबदारी स्वत:ला विठ्ठल भक्त म्हणविणार्‍या प्रत्येकावर येते. विठ्ठल काय किंवा विठ्ठलालाच सर्वस्व मानून तसे आचरण करणारा भागवत संप्रदाय अथवा वारकरी संप्रदाय काय, या परंपरेत कोणाचाच द्वेष करायला शिकविले जात नाही. संत ज्ञानेश्‍वरांनी समस्त जगासाठी पसायदान मागताना ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो’ असे मागणे ईश्‍वराकडे केले. याचा अर्थ ते कोणत्याही व्यक्तीमधील दुष्टावा,दुरावा संपावा असे म्हणतात. त्यांना कोणती व्यक्ती संपविणे अपेक्षित नव्हते. वारकरी संप्रदायाचे मोठेपण यातच आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ असे म्हणणारा विचार असेल किंवा ज्यावेळी कोणतीही स्त्रीमुक्तीची आंदोलनेही नव्हती त्यावेळीही ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’ म्हणणार्‍यांना संतत्व देणारा हा विचार आहे. म्हणूनच आजच्या परिस्थितीत हाच विचार केवळ शब्दांनी नव्हे तर त्या शब्दांमधील भक्तीने, भावनेने पुढे नेण्याची आणि जगण्याचे सूत्र म्हणून अंगिकारण्याची खर्‍या अर्थाने आवश्यकता आहे.

 

 

आज महाराष्ट्रातील समाज जीवन वेगवेगळ्या विषयांनी ढवळून निघालेले आहे. आरक्षणासारख्या विषयातून सामाजिक दुही वाढीस लागते की काय अशी परिस्थिती आहे. राजकीय किंवा व्यक्तिगत द्वेषातून सरकार नावाची यंत्रणासुध्दा खालच्या पातळीवर पोहचून व्यक्तीच संपविण्याची नवी संस्कृती या समाजातही रुजू पाहात आहे. ही विषवल्ली रोखायची असेल तर केवळ आषाढी एकादशीच्या दिवशीच नव्हे तर रोजच खर्‍या अर्थाने भागवत संप्रदायाने दिलेला विचार अंगिकारणे आणि विठ्ठल जगण्यामध्ये उतरविणे हाच मार्ग आहे.

Advertisement

Advertisement