सोलापूर :अरण येथून मंगळवार (दि.१५) जुलै बेपत्ता रोजी (Crime)झालेल्या कार्तिक खंडागळे या दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या खुनाचे धागेदोरे टेंभुर्णी पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून हाती लागले. मारेकरी हा चुलत भाऊच असून, त्याने घरकुलावरून (House)भावा भावाच्या वादविवादातून खून केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय १९) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेत आपला खाक्या दाखवला. यावेळी त्याने कार्तिकला मारल्याची कबुली दिली. या घटनेनंतर आरोपीला तपास कामासाठी पथकाने घटनास्थळी नेल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी संदेशने कार्तिकला मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता अरणहून मोडनिंब येथे मोटारसायकलवर बसून आणले. त्याला खाण्यासाठी हॉटेलमधून पेढे व भेळ घेऊन दिली. त्यानंतर त्याला गाडीवर बसवून नेऊन त्याची हत्या केली, अशी माहिती सीसीटीव्हीतील तपासातून पुढे आली आहे.कार्तिकचा मृतदेह सापडताच टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे निरीक्षक नारायण पवार, कुलदीप सोनटक्के, गिरीष जोग, सहदेव देवकते, स्वाती सुरवसे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.
सीसीटीव्हीमुळे प्रकरणाचे गूढ उलगडले
कार्तिकचा खून होऊन चार दिवस उलटत असताना त्याच्या मारेकरी सापडत नसल्याने कुटुंबात अस्वस्थता निर्माण झाली होती.
दरम्यान, मृतदेह सापडताच नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आणि पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. मोडनिंब ग्रामपंचायत येथील सीसीटीव्ही फुटेज तपासताच आरोपी चुलत भाऊ हा कार्तिकला दुचाकीवर बसवून नेताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर पोलिसांनी चुलत भावाला ताब्यात घेतले.
आणखी कोणाचा सहभाग आहे का ?
सध्या एका आरोपीला जेरबंद केले असले तरी या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, या मुद्यावर पोलिस तपास करीत आहेत. शनिवारी रात्री सोलापूर येथून कार्तिकचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून पाठविण्यात आला. रात्री १०:३० वाजता अरण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.