Advertisement

सत्ता डोक्यात गेल्यावर काय होते याचे उद्धरण दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये पाहायला मिळाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचा प्रदेशाध्यक्ष असलेला सुरज चव्हाण निवेदन घेऊन आलेल्या आंदोलकांना कशी मारहाण करतो हे साऱ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिले. ज्यांना मारहाण झाली ते छावाचे पदाधिकारी असल्याने असेल किंवा घटनेनंतर राज्यभरातून ज्या प्रतिक्रिया उमटल्या म्हणून असेल, आपला पक्ष फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर चालतो , यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन चालतो हे दाखविण्यासाठी असेल , पण अजित पवारांनी सुरज चव्हाणलापदाचा राजीनामा द्यायला सांगितलं. खरेतर असल्या प्रवृत्तीची हकालपट्टी अजित पवारांनी केली असती, तर ते अधिक चांगले झाले असते , पण राजीनामा मागितला हे देखील काही कमी नाही, त्याचे स्वागतच. झुंडशाहीला लोकशाही व्यवस्थेत जागा नाही, हे दाखवून देणे आवश्यक होतं , ते अजित पवारांनी दाखविले, मात्र त्यासोबतच सत्तेच्या जोरावरच जो मस्तवालपणा आज अनेकांमध्ये दिसतो आणि राज्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंनी तर तो वारंवार दाखविला आहे, त्या माणिकराव कोकाटेंना अनेकदा समज देऊन देखील समज आलेली नसेल तर अजित पवार त्यांना आणखी किती दिवस अभय देणार आहेत?
 
            महाराष्ट्राला शेतकऱ्यांच्या संदर्भाने संवेदनशील असलेल्या अनेक नेत्यांची मोठी परंपरा आहे. वसंतराव नाईकांसारखे मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती पाऊस पडला तर आनंदाने नाचायचे असे सांगितले जाते. शेतकरी जगला तर देश जगेल याचे भान त्यांना होते. त्याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खलनायक ठरविणारी आणि त्यांच्याबद्दल कायम अनुद्गार काढणारी राजकीय मानसिकता मागच्या काही काळात वाढीस लागलेली आहे. खार म्हणजे राज्याच्या कृषी मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात शेतकऱ्यांबद्दल किती विखारी भावना आहेत हे महाराष्ट्राने माणिकराव कोकाटेंच्या माध्यमातून अनुभवले. या माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी एक दोन वेळा जाहीर समज देखील दिली, मात्र अजित पवारांना राजकारणात आपली गरज आहे आणि कोणाची तरी राजकीय गोची करण्यासाठीच आपल्याला महत्व दिलेले आहे याची पुरती खात्री असल्याने असेल कदाचित, अजित पवारांनी दिलेली समज गांभीर्याने घेण्याची आवश्यकता कधी माणिकराव कोकाटेंना वाटली नाही. तेच माणिकराव कोकाटे राज्याच्या कायदेमंडळात , राज्याच्या सर्वोच्च सभागृहात, 'जंगली रमी' हा जुगार खेळात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आणि उभ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. ज्या ऑनलाईन जुगाराने देशभरात अनेकजण देशोधडीला लागले आहेत, अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, तो ओंलीण जुगार राज्याचे मंत्री चक्क सभागृहात खेळतात , हे सारे सत्तेच्या मस्तीत असलेल्या या लोकांनी महाराष्ट्र कोठे नेला आहे हे दाखवायला पुरेसे आहे. वरती पुन्हा हेच माणिकराव कोकाटे 'मी फोन उगढला आणि युट्युबवर जाहिरात आली, तुमच्या फोनवर येत नाहीत का अशा जाहिराती ' अशी मग्रुरी करायला कचरत नाहीत, यावरूनच त्यांच्यातला सत्तेमुळे आलेला कोडगेपणा समोर येतो.
माणिकराव कोकाटेंचा व्हिडीओ समोर आल्यामुळे लातूरमध्ये भावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिले, आणि त्यांच्या अंगावर पत्ते फेकले. आंदोलनाचे कोणते मार्ग अवलंबावेत याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, त्यामुळे पत्ते फेकणे योग्य आहे असे आमचे म्हणणे नाही, मात्र हे सारे प्रकरण सुनील तटकरे संयमाने घेत असताना, सुरज चव्हाण या युवक प्रदेशाध्यक्षाला आपल्या नेत्याप्रति असलेल्या निष्ठा दाखविण्याची उबळ आली आणि त्याने आंदोलकांना चक्क मारहाण केली. सारा महाराष्ट्र हे पाहत राहिला. ज्या माणिकराव कोकाटेंवरून हे सारे सुरु झाले, ते तिकडे सुखात, आणि निवेदन देणारांना मात्र सत्तेतल्या कार्यकर्त्यांची झुंडशाही सहन करावी लागते. तो कार्यकर्ता देखील थेट अजित पवारांच्या पक्षाचा युवक आघाडीचा प्रदेशाध्यक्ष . चार दिवसांपूर्वीच बारामतीमध्ये अजित पवारांनी जो कोणी चुकीचे वागेल त्याला टायरमध्ये घेऊन मारा असे पोलिसांना सांगितले होते, पण हे सारे भाषणात बोलायचे असते याची पुरती खात्री सत्तेतल्या कार्यकर्त्यांना असतेच. त्यामुळे सुरज चव्हाणवर फार काही मोठी कारवाई होईल असे समजणे म्हणजे भाबडेपणाचे. पण या घटनेवरून राज्यात संताप व्यक्त झाल्यानंतर अजित पवारांनी सुरज चव्हाणला राजीनामा द्यायला सांगितलं, सुनील तटकरेंनी त्याला दौऱ्यापासून दूर केले, खरेतर अजित पवार किंवा सुनील तटकरे त्या क्षणाला त्याची हकालपट्टी करू शकले असते , पण त्यांनी राजीनामा ड्यसायला लावला, काही का असेना , झुंडशाही नको असा संदेश तर दिला याचे स्वागतच. पण हे सारे होत असताना माणिकराव कोकाटेंचे काय ? ते मंत्रिपदावरून काहीही बोलत असतात आणि त्यांना केवळ समज देऊन सोडले जाते, अजित पवारांसारख्या खमक्या नेत्याची माणिकराव कोकाटेंसारख्या मस्तवाल सत्ताधीशाला सहन करण्याची कोणती 'मजबुरी ' आहे ? शेतकरी आणि सामान्यांबद्दल कोणत्याही संवेदना नसलेल्या व्यक्तीला अभय देऊन अजित पवार आणखी कितीकाळ राज्याला असल्या माणकांचे प्रताप सहन करायला लावणार आहेत ?
 

Advertisement

Advertisement