धाराशिव दि.१०(प्रतिनिधी): तुळजापूर शहरात आणि श्री तुळजाभवानी मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचा आरोप करत, हिंदुत्ववादी सरकारनेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का, असा सवाल आ.कैलास पाटील यांनी विधानसभा पावसाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे केली.
आ.पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने ७ मार्च २०२४ रोजी जारी केलेल्या राजपत्रानुसार सुरक्षेच्या कारणास्तव काही चिनी कंपन्यांच्या सीसीटीव्ही प्रणालींवर निर्बंध घातले आहेत. तसेच STQC (स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन) मान्यताप्राप्त कंपन्यांचेच सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तुळजापूर शहरात ६७ ठिकाणी युनिव्हियू (Uniview) कंपनीचे सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.तुळजाभवानीच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारली जाऊ शकत नाही. गृह विभागाच्या अखत्यारीत हे काम होत असताना केंद्र सरकारच्या नियमांचे पालन का झाले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे," अशी मागणी केली.इतिहासाचा संदर्भ देताना पाटील म्हणाले की, १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीवेळी स्थानिक पुजारी आणि तुळजापूरकरांनी आई तुळजाभवानीच्या मूर्तीचे रक्षण केले होते. मात्र, आज हिंदुत्ववादी सरकारच्या काळातच मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या घटनेचाही उल्लेख करत, "मतदारांनी हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिलेल्या सरकारच्या काळातच हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. हेच हिंदुत्व आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.चिनी कंपनीच्या सर्व्हरद्वारे संवेदनशील माहिती परदेशात जाण्याचा धोका असल्याचा दावा करत, या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी, संबंधित यंत्रणा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहामार्फत सरकारकडे केली.

