Advertisement

जिल्हा रूग्णालयातील लिफ्ट पहिल्याच दिवशी बंद

प्रजापत्र | Thursday, 09/07/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.९(प्रतिनिधी):जिल्हा रुग्णालयात आज पुन्हा एकदा लिफ्ट बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी वॉर्डकडे जाणारी लिफ्ट अचानक बंद पडल्याने सुमारे अर्धा तास १८ रुग्ण, नातेवाईक लिफ्टमध्ये अडकून पडले होते. शेवटी अर्ध्या तासानंतर रूग्णालयात कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून लिफ्टचे दार उघडले अन् सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. या प्रकारानंतर लगेचच लिफ्टच्या दारावर 'लिफ्ट बंद आहे, कोणीही वापर करू नये' अशी चिठ्ठी लावण्यात आली. 
  दरम्यान जिल्हा रूग्णांतर्गत असलेली माता व बालसंगोपन विभागाच्या नवीन इमारतीत आजपासून रूग्णसेवा सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी लिफ्ट अचानक बंद पडल्याने रूग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दोन वेळा या इमारतीची पाहणी केली होती. मात्र पाहणी करून आणि सूचना देवूनही सुधारणा न झाल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.लिफ्टमध्ये सुमारे १८ रुग्ण, २ नातेवाईक, ३ सिझेरियन रुग्णांच्या कुटुंबीयांसह इतर काही नागरिक अडकले होते. लिफ्टमधील फॅनही बंद असल्याची तक्रार करण्यात आली असून त्यामुळे आत घुसमट होऊन अनेक जण घाबरले. काही जण रडू लागल्याचे ही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अखेर सुमारे अर्धा तासानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून लिफ्टचे दार उघडत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. 

 

Advertisement

Advertisement