एकापेक्षा अधिक पक्षांनी एकत्र यायचे म्हटले की जागा वाटप नेहमीच डोकेदुखी असते, त्यात महाराष्ट्रात तर वेगळेच चित्र आहे. काँग्रेससोबत दुभंगलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना (यातील गटांची नावे भलेही वेगळी असतील) तर भाजपसोबत असणारे पक्ष देखील दुभागलेले,मात्र आपली शक्ती कमी झाल्याचे मान्य मात्र कोणीच करणार नाही. भाजपला तर राज्यात इतर कोणतेच पक्ष नको आहेत हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय , जागावाटपाचे आव्हान दोघांसमोरही आहेच.
साऱ्या देशालाच लोकसभा निवडणुकांचे वेड लागलेलेआहेत. पंतप्रधानांचे मोठमोठे कार्यक्रम धडाक्यात सुरु आहेत , त्यामुळे निवडणुक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा करेल असे अपेक्षित आहे. 'अबकी बार,चारसो पार' ची घोषणा दिलेल्या भाजपची पहिली यादी देखील कदाचित आज बाहेर पडेल . त्यात किती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होतील हे आज सांगता येणार नसले तरी किमान १०० उमेदवारांची यादी आज जाहीर होऊ शकते. असे करून भाजप इतर पक्षांच्या तुलनेत , म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या तुलनेत आपण पुढे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे काँग्रेस आणि आमआदमी पक्षात जागा वाटप ठरले असून आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणचे उमेदवार देखील जाहीर केले आहेत.पण हे सारे होत असताना महाराष्ट्रात मात्र महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे.
महायुतीमध्ये भाजपने शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना सोबत घेतलेले आहे. मागच्यावेळी युतीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांमध्येच जागावाटप झाले होते .त्यामुळे फारशी ओढाताण नव्हती. मात्र आता शिवसेनेची दोन शकले पडली आहेत, मात्र त्यानाच आग्रह एकसंघ शिवसेने इतक्या, फार तर चार दोन कमी जागा मिळाव्यात असा आहे .अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील स्वतःचे अस्तित्व ठेवायचे असेल तर महाराष्ट्रात मागच्या वेळी एकसंघ राष्ट्रवादीने लढविल्या होत्या त्याच्या आसपास जागा मिळवाव्या लागतील. शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी, जर त्यांना तशा प्रमाणात जागा मिळाल्या नाहीत, तर हे दोन्ही नेते भाजपच्या मागे फरफटत जात आहेत असाच संदेश राज्यामध्ये जाणार आहे, आणि तो शिंदे काय किंवा अजित पवार काय, कोणालाच परवडणार नाही. तर दुसरीकडे निवडणुकीच्या आणि जागावाटपाच्या राजकारणात आक्रमक असलेला भाजप ,ज्यांना नेहमीच 'शतप्रतिशत' ची तहान असते, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नखरे किती सहन करेल,आणि का करेल या प्रश्नांभोवतीच जागा वाटप अडलेले आहे. बरे मागच्या काही काळात भाजपने विरोधीपक्षातील अनेकांना सोबत घेतले आहे, आणखीही काहींनी आपल्यासोबत यावे अशी भाजपची इच्छा आहे, ज्यांना सोबत घेतले त्यांची व्यवस्था लावण्याचा विचार देखील भाजपला करावा लागणार आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्वांना खुश ठेवायचे आणि स्वतःचा वरचष्मा देखील कायम ठेवायचा हे भाजप कसे साधणार हाच मोठा प्रश्न आहे.
महाविकास आघाडीची मागच्या काळात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीची शकले पडली . त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांकडेही अनेक नेते आता महायुतीमध्ये आहेत. काँग्रेस त्या तुलनेत अभंग वाटत होती , मात्र अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसची अवस्था देखील फार वेगळी राहिलेली नाही. तरीही या तिन्ही पक्षातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा भाऊ व्हायचे आहे, तर त्याचवेळी काँग्रेस देखील आपला हट्ट सोडायला तयार नाही. यावेळी राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार यांची भूमिका बऱ्यापैकी तडजोडीची आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील तडजोडी नक्कीच अडचणीच्या आहेतच. त्यातच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे करायचे काय? वंचितच्या मागण्या मान्य करायच्या तर तिन्ही पक्षांची गणिते बिघडणार आणि वंचितला टाळायचे, तर त्यांना आयते कारण सापडणार, पुन्हा धर्मनिरपेक्ष मतांच्या विभागणीचा धोका आहेच, त्यामुळे महाविकास आघाडीला देखील येत्या दोन दिवसात काही तरी निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांच्यापुढे देखील राजकीय समंजसपणा दाखविण्याचे आव्हान आहेच.