पुणे : पती व सासरच्या(Crime) मंडळींकडून होत असलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे, तसेच कंपनी सुरू करण्यासाठी २० लाख रुपये देण्याच्या दबावामुळे २५ वर्षीय विवाहितेने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी घडली असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, स्नेहा झेंडगे आणि विशाल झेंडगे यांचा विवाह मे २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवस स्नेहाचे आयुष्य सुरळीत चालले, मात्र लवकरच सासरकडून त्रास सुरू झाला. पती व कुटुंबीयांनी कंपनी सुरू करण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम आणून द्यावी म्हणून स्नेहावर वेळोवेळी दबाव आणला जाऊ लागला. पैसे मिळवण्यासाठी केवळ मानसिक छळच नव्हे तर मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारची वागणूक दिली जात होती.स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता, मात्र सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे स्नेहाचे मानसिक तणाव अधिकच वाढले. सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर ९ ऑगस्ट २०२५ रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले.या घटनेनंतर मयत स्नेहाचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, व्यवसाय – शेती, रा. कर्देहळी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी(Police) पती, सासरे, सासू, दिर, नणंद, नणंदेचा पती आणि सासऱ्यांचे साडू अशा सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.