Advertisement

 कुख्यात गुंडाचा कोर्टात राडा

प्रजापत्र | Sunday, 10/08/2025
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी (८ ऑगस्ट) दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. मोक्का कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहात असलेला कुख्यात गुंड अजय रमेश भाऊ उर्फ ठाकूर याने सुनावणीदरम्यान पोलिस(Police )अंमलदाराच्या छातीत लाथ मारून शिवीगाळ केली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून वेदांतनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोलिसावर हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          अजय ठाकूर आणि त्याची पत्नी राणी हे दोघेही (Crime)अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी फेब्रुवारीपासून कारागृहात असून ‘मोक्का’ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना सुनावणीसाठी जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. मात्र, कोर्टातील क्लर्क सुट्टीवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि पुढील तारीख  २१ ऑगस्ट निश्चित करण्यात आली.

यानंतर आरोपींना पुन्हा कारागृहात नेण्याची प्रक्रिया सुरू असताना अजय ठाकूरने पोलिसांशी हुज्जत घालत नातेवाईकांना भेटायची मागणी केली. सहायक फौजदार अमरसिंग ठाकूर यांनी त्याला नियम समजावून सांगितले असता, अजय अचानक संतापून थेट त्यांच्या छाताडात लाथ मारत कोर्टातच गोंधळ घालू लागला. अजय ठाकूर हा छत्रपती संभाजीनगरातील गुन्हेगारी जगतातील कुख्यात नाव असून सिडको, सातारा, मुकुंदवाडी, जिन्सी, क्रांती चौक यांसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये पोक्सोसह तब्बल 38 गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. या ताज्या घटनेनंतर पुन्हा एकदा न्यायालय आणि पोलिसांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement

Advertisement