Advertisement

धक्कादायक!बीडसह राज्यभरात घटला स्त्री जन्मदर

प्रजापत्र | Thursday, 31/12/2020
बातमी शेअर करा

बीड   : बेटी बचाओ सारख्या योजना राबवत स्त्री जन्माच्या स्वागताचे ढोल वाजविले जात असताना आणि ठिकठिकाणी स्त्री जन्मदर वाढल्याचे भासविले जात असतानाच राज्यात मागच्या पाच वर्षात स्त्री जन्मदरात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात मागच्या पाच वर्षाच्या तुलनेत स्त्री जन्मदर धक्कादायकरित्या घटनला आहे. 2015-16 मध्ये जिल्ह्याचा स्त्री जन्मदर 1046 होता तो आता 843 वर येऊन पोहचला आहे. राज्यभरात मागच्या काही काळात स्त्री जन्माच्या स्वागतासाठी अनेक योजना राबविल्या गेल्या. बेटी बचाओ, बेटी पढाओ सारखे अभियान राबविले गेले. मागच्या दोन तीन वर्षात स्थानिक प्रशासनाने स्त्री जन्मदर वाढत असल्याचेही सांगितले. मात्र राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणाच्या पाचव्या अहवालाने स्त्री जन्मदरासंदर्भातील भिषण वास्तव समोर आणले आहे. त्यानूसार 2015-16 च्या तुलनेत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये स्त्री जन्मदर घटला आहे. 2015-16 मध्ये राज्याचा स्त्री जन्मदर 1000 मुलांमागे 924 मुली इतका होता. तो आता 913 वर आला आहे. 

 

 हेही वाचा 

मागच्या दहा वर्षात स्त्री जन्मदर वाढण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले. प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी), गर्भपात प्रतिबंधक कायदा (एमटीपी) यातील तरतूदी अधिक कठोर करण्यात आल्या. त्या सोबतच स्त्री जन्माच्या स्वागतासाठी महाराष्ट्रसारख्या राज्याने काही योजनाही राबविल्या. मुलींच्या जन्मावर त्यांच्या नावावर 18 वर्षाकरीता मुदत ठेव ठेवण्याची योजना राबविली गेली. असे असतानाही राज्याचा स्त्री जन्मदर वाढण्याऐवजी घटला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या महिला बालककल्याण आयुक्ताने देखील या संदर्भात चिंता व्यक्त करत सर्व उपाय योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहे. 

 

Advertisement

Advertisement