अयोध्येतील राम मंदिरात, बांधकाम पूर्ण झालेले नसतानाही , रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे. यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. सारा देश जणू काही राममय झाला आहे हे भासविण्यात रामभक्त आणि त्यातही संघ परिवार, भाजप यशस्वी झाला आहे. या सोहळ्याचे कर्तेधर्ते म्हणून नरेंद्र मोदींना दाखविण्यात देखील केंद्रीय सत्तेला यश आले आहे. या देशातील बहुसंख्यांकांच्या आस्थेचे प्रतीक म्हणून हा सोहळा भासविले जात आहे. रामाला विवर्ध करण्याचे काहीच कारण नाही. पण प्रश्न आहे तो केवळ रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली म्हणून देशात रामराज्य येणार आहे का ? एकवेळ महात्मा गांधींच्या संकल्पनेतील रामराज्य आपण काही काळासाठी विसरून जाऊ , कारण सध्या सत्तेला गांधीच मान्य नाहीत, पण किमान तुलसीदासांनी रामचरित मानस मधून जी रामराज्याची संकल्पना मांडली होती, त्याच्याशी तरी आजचे सत्ताधीश प्रतिबद्ध राहणार आहेत का ?
राम, रामाचे अस्तित्व, रामाचा कालखंड, वेगवेगळया रामायणातील वेगवेगळा राम हे सारे विषय आणि या विषयांच्या भोवतीने निर्माण झालेले वाद देखील थोडावेळ बाजूला ठेवूयात आणि राम ही यादेशातील बहुसंख्यांकाची भावनिक, धार्मिक आस्था आहे हे मान्य करूयात . पण ही जी आस्था आहे ती केवळ एखाद्या मंदिर किंवा मूर्तीशी आहे , का रामराज्य या संकल्पनेसोबत आहे याचा तरी विचार करावा लागेलच. रामाला एक आदर्श राजा म्हणून ज्यावेळी समोर आणले जाते, त्यावेळी साहजिकच रामराज्य या संकल्पनेलाच विचार करावा लागतो. रामायणाला इतिहास समजायचे की पुराणकथा, हा वादाचा विषय असला तरी 'रामराज्य' ही संकल्पना आपल्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य घटक आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. रामराज्याची स्थापना हा आदर्श पुढे ठेवूनच महात्मा गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या नेत्यांपासून तर स्वातंत्र्योत्तर काळात निवडणुका लढविणाऱ्या नेत्यांपर्यंत प्रत्येकाने राजकारण केले आहे. महात्मा गांधींनी त्यांची रामराज्याची संकल्पना 'यंग इंडिया'मधून मांडली होती. 'मी रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असा समजत नाही. रामराज्य हे देवाचे राज्य आहे, असे मी मानतो. माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोन्हीही एक आणि सारखेच आहेत; सत्य आणि सद्गुणांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नाही. माझ्या कल्पनेतील राम या पृथ्वीतलावर खरोखरच होऊन गेला का, हे मला माहिती नाही. परंतु, रामायण हे खऱ्या लोकशाहीचे असे उदाहरण आहे, जिथे लांबलचक आणि महागड्या प्रक्रियांना सामोरे न जातासुद्धा समाजातील शेवटच्या नागरिकाला न्याय मिळू शकतो.' गांधीजींच्या मते, रामराज्याची राजकीय व्याख्या, 'धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य' अशी होती. आजच्या राज्यकर्त्यांना जिथे गांधीजींचं मान्य नाहीत, तिथे गांधींचा विचार आणि त्यांची रामराज्याची संकल्पना मान्य व्हावी अशी अपेक्षा करणे देखील गैर आहे. पण गांधींजींचे विचार एकवेळ बाजूला ठेवूयात . ज्या रामांना भगवान म्हणून आज प्रतिष्ठापित केले जात आहे, त्या रामांचे चरित्रकार, म्हणजे रामचरितमानसचे रचयिता तुलसीदासजींनी देखील रामराज्याची संकल्पना मांडली आहे, त्याचा तरी अंगीकार आजचे सत्ताधीश करणार आहेत का ?
तुलसीदासजी रामराज्याची संकल्पना मांडताना म्हणतात
दैहिक दैविक भौतिक तापा। राम राज नहिं काहुहि ब्यापा
सब नर करहिं परस्पर प्रीती। चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती
अल्पमृत्यु नहिं कवनिउ पीरा। सब सुंदर सब बिरुज सरीरा
नहिं दरिद्र कोउ दुखी न दीना। नहिं कोउ अबुध न लच्छन हीना
म्हणजे ज्या राज्यात दैहिक, दैविक कोणतेच ताप (संकट, किंवा दुःख ) नाहीत, सगळे लोक परस्परांवर प्रेम करतात , स्वतःच्या धर्माचे आणि नीतीचे आचरण करत, ते रामराज्य . जिथे कोणाही अल्पायुषी नाही , कोणी दुःखी दरिद्री नाही , कोणी एकमेकांचा द्वेष करीत नाही , जिथे नागरिक चांगल्या लक्षणांनी अलंकारात आहेत, ते म्हणजे रामराज्य . आता किमान आज ' राम आयेंगे' म्हणताना तुलसीदासांच्या रामचरितमानस मधील संदर्भ तरी खरे मानावेच लागतील ना ? मग आज त्या पार्श्वभूमीवर पाहू गेल्यास देशाचवे चित्र काय आहे? महाराष्ट्रापासून मणिपूरपर्यंत आणि काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत सत्तेच्या आशीर्वादाने परस्पर द्वेष पसरविला जात आहे का प्रेम ? जातीय, वांशिक विद्वेष वाढत असताना सत्तेच्या पातळीवर ते थांबविण्याचे काही प्रयत्न होत आहेत का ? दैन्य , दारिद्र्य यावर वेगळे काही लिहिण्या बोलण्याची आवश्यकता तरी उरलेली आहे का ? जिथे आरोग्य सेवानभावी बालके रुग्णालयात दगावत आहेत, जिथे बलात्काऱ्यांना सरकारला अधिकार नसतानाही सोडून दिले जात आहे, जिथे न्यायव्यवस्थेला देखील फसविले जात आहे, जिथे रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत , ग्रोगरिबांना बँकांमधून लाखभर रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि आणि त्याचवेळी मूठभर लोकांची हजारो कोटीची कर्जे क्षणात माफ होतात, बाकी हिंदू मुस्लिम एकता असले शब्द आता इतिहास झाले आहेत. रामचरितमानस 'भलेही चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती' म्हणजे प्रत्येकाच्या स्वधर्माचे आचरण शिकवीत असेल पण आजचे वास्तव काय आहे? त्यामुळे आज राम येत आहेत, प्रभू येत आहेत हे ठीक आहे, पण रामराज्याचे काय ? ते कधी येईल ?