मुंबई : मुंबईत दहीहंडी (Dahihadi) उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक राजकीय नेते दहीहंडी उत्सवात सहभागी होत गोविंदाचा उत्साह वाढवत आहेत. एकीकडे गोविंदा पथकांनी विक्रमांचे मनोरे रचले असताना दुसरीकडे मुंबईतील (Mumbai) मानखुर्द एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बाल गोविंदा पथकातील लहानग्या गोविंदाला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील ही दुर्घटना असून दहिहंडी रोप बांधताना तोल गेल्याने गोविंदाचा खाली पडून अपघात झाला. या दुर्घटनेनंतर जखमी अवस्थेतील गोविंदाला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी गोविंदाला मृत घोषित केले. या अपघाताच्या घटनेनं दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून बाल गोविंदा पथकावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सावात सकाळपासून ३० गोविंदा जखमी झाले असून एका गोविंदाचा मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानखुर्द येथे दुपारी ३ वाजता गोविंदाच्या अपघाताची घटना घडली. जगमोहन शिवकुमार चौधरी असं मृत्युमुखी पडलेल्या गोविंदाचे नाव आहे.