कोणत्याही रुग्णालयामध्ये एखाद्या रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याच्या विषयाबाबत केंद्रीय आरोग्य खात्याने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयूबाबत अशा प्रकारच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यात आल्या नव्हत्या. पण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊनच केंद्रीय आरोग्य खात्याने त्याची दखल घेतली आणि अतिदक्षता विभागात कोणावर उपचार करायचे याबाबत स्पष्ट सूचना प्रसारित केल्या आहेत,या निर्णयाचे खऱ्या अर्थाने स्वागत करण्यासारखेच आहे पण त्याचे पालन सर्वत्र होणार का ? हा प्रश्न आहे,आणि त्यासाठी सरकार काय पाऊले उचलणारे हेही महत्वाचे ठरते.
आता रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची जर इच्छा नसेल किंवा त्याच्या नातेवाईकांना जर वाटत नसेल तर कोणत्याही रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करता येणार नाही, ही महत्त्वाची मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने जाहीर केली आहे. खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर वैद्यकीय सेवेकडेसुद्धा व्यवसाय म्हणूनच पाहिले जाऊ लागले आहे. मोठंमोठी हॉस्पिटल्स उभारताना रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून त्याचा खर्च लवकरात लवकर काढण्यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असतात,हे सर्वच डॉक्टरांच्या बाबतीत लागू होते असे नाही.मात्र काही अपवाद वगळता रुग्णालय सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे अलीकडच्या काळात सातत्याने अधोरिखित होत आहे.साधारणपणे कोणत्याही रुग्णालयातील मुख्य उत्पन्नाचा स्रोत हा आयसीयूमध्ये दाखल झालेले रुग्ण हाच मानला जातो.कारण जनरल वॉर्डमध्ये एखाद्या रुग्णाला जर दाखल केले असेल तर त्याला जेवढा खर्च येतो त्याच्या चार ते पाच पट अधिक खर्च आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला करावा लागतो हे वास्तव आहे.
साहजिकच गेल्या काही वर्षांमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये गरज नसतानासुद्धा एखाद्या सर्वसाधारण रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्याच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. केवळ एखाद्या रुग्णालयातील आयसीयू बेड्स रिकामे आहेत म्हणून एखाद्या किरकोळ रुग्णाला या आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्याच्या प्रकारामध्येसुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. एखाद्या मोठ्या रुग्णालयातील आयसीयू बेड रिकामे असणे म्हणजे त्या रुग्णालयाच्या मार्केटिंग विभागाचे अपयश मानले जाते. एकीकडे रुग्णालयांचा असा कारभार सुरू जरी असला तरी अशा प्रकारे विनाकारण आयसीयू बेडवर रुग्णांची भरती केली जात असल्यामुळे खरोखरच एखाद्या गंभीर रुग्णाला अतिदक्षता उपचारांची गरज असेल तर त्याला अशा प्रकारे बेड उपलब्ध होत नाही ही बाब जास्त महत्त्वाची आहे.
त्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करताना देशातील प्रमुख २४ आरोग्यविषयक तज्ज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिक यांची मदत घेतली आहे. म्हणजे प्रत्यक्ष रुग्णालयाशी संबंधित अनेक डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी चर्चा करूनच या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतासारख्या मोठ्या देशामधील ताजी आकडेवारी लक्षात घेता देशातील एकूण आयसीयू बेडची संख्या साधारण एक लाख एवढी असल्याचे कळते.महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयसीयू बेड्स किंवा अतिदक्षतेचे उपचार फक्त खासगी रुग्णालयातच उपलब्ध होतात आणि सरकारी आरोग्यसेवेचा लाभ घेणार्या सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयातील अतिदक्षतेचे उपचार परवडत नाहीत हे वास्तव आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व असे आहे की,अतिदक्षता विभागात रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याचा आजार खूपच गंभीर आहे की काय अशी शंका त्याच्या मनात तयार होते आणि त्याचा मानसिक परिणामही त्याच्या आजारावर होऊ शकतो. म्हणूनच रुग्णाची किंवा त्याच्या नातेवाईकांची इच्छा असेल तरच त्याला अतिदक्षता विभागात दाखल करणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वसाधारणपणे हृदयविकाराशी संबंधित आजाराने ग्रासलेले रुग्ण किंवा गंभीर अपघातात जखमी झालेले रुग्ण यांना अतिदक्षता विभागातील उपचारांची गरज असते पण गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय किरकोळ आजारासाठीसुद्धा एखाद्या रुग्णाला अतिदक्षता विभागात पाठवण्याची जी पद्धत सुरू झाली आहे ती लक्षात आल्यानेच अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना तयार कराव्या लागल्या आहेत.एखाद्या रुग्णालयाचे आयसीयूचे टारगेट पूर्ण करण्यासाठी किरकोळ रुग्णाला जर आयसीयूमध्ये भरती करण्याची प्रक्रिया अशी सुरू राहिली तर जेव्हा एखाद्या गंभीर रुग्णाला खरोखरच आयसीयू बेडची गरज असेल तेव्हा त्याला ती सुविधा उपलब्ध होणार नाही हा धोकाही या निमित्ताने लक्षात घ्यायला हवा. अर्थात, आरोग्य खात्याने जारी केलेल्या या मार्गदर्शक सूचना बंधनकारक आहेत असे नाही पण एकूणच जर सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारायची असेल आणि सर्वसामान्य नागरिकांना ही सेवा परवडण्यासारखी वाटायची असेल तर रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या वापराबाबत केंद्रीय आरोग्य खात्याने केलेल्या या मार्गदर्शक सूचनांकडे सर्वच संबंधित गांभीर्याने लक्ष देतील अशी आशा करावी लागेल.