Advertisement

संपादकीय अग्रलेख- याच साठी होता अट्टाहास ?

प्रजापत्र | Friday, 05/01/2024
बातमी शेअर करा

 जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अशी ओळख असलेल्या , फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात प्रथमच पोलीस महासंचालक म्हणून एका महिला अधिकाऱ्याला संधी मिळाली हे तसे चांगलेच. यापूर्वी देखील भारतीय पोलीस सेवेतील अनेक कर्तबगार महिला पोलीस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली होतीच , पण राज्याच्या पोलीस दलाची प्रमुख म्हणून काम करणारी  महिला म्हणून रश्मी शुक्ल  पहिल्याच. भलेही त्यांच्या कारकिर्दीचे सहाच महिने शिल्लक असतील, पण हव्या त्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रघात राज्याला नवा नाही आणि अनेकदा हव्या त्या अधिकाऱ्यांसाठी कायदा बदलण्याचा पायंडा देखील केंद्राने पाडलेला आहेच . त्यामुळे रश्मी शुक्ला यांना काम करायला खूप संधी मिळेल अशी अपेक्षा बाळगायला देखील हरकत नाही.  
 

 

अखेर भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. राज्याच्या पोलिसप्रमुखपदी महिला अधिकाऱ्याला संधी मिळण्याची तशी ही पहिलीच वेळ. त्यामुळे साहजिकच याबद्दल आनंद, अभिमान असे वाटायला देखील हरकत नाही. यापूर्वी राज्यात अनेक महिला पोलीस अधिकारी झाल्या, त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम देखील केले,मीरा बोरवणकर असतील किंवा आणखी कोणी, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची झलक दाखविली आहेच . मात्र यापैकी कोणाला पोलीस महासंचालक यापदावर येत आले नव्हते . त्यामुळे रश्मी शुक्ला यांचे अभिनंदनच .

 

 

मात्र अभिनंदन करतानाच काही अपेक्षा देखील. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पद हे मोठी गौरवशाली परंपरा असणारे पद आहे. या पदावरून अनेक कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांनी पारदर्शीपणा आणि पक्षपातविरहित कारकिर्दीची उदाहरणे घालून दिलेली आहेत. पोलीस दलात काम करताना थोडे उन्नीस बीस होणारच, पण तरीही आपल्या पदाला न्याय देतानाच कोणावर अन्याय होणार नाही किंवा आपल्यावर कोना एकाच शिक्का बसणार नाही अशी काळजी यापूर्वी अनेकांनी घेतलं आहे. फार पूर्वीची नाही, पण ऐंशीच्या दशकापासूनची काही नावे अजूनही सांगता येतील , त्यात शिवाजीराव बारवकर , दत्ताच्या सोमण , ए. व्ही. सोमण, अरविंद इनामदार , पी एस बासरीचा, अनामी रॉय , दत्तात्रय पडसलगीकर अशी काही नावे सांगता येतील. त्यांच्यातील कर्तव्य कठोरता नेहमीच चर्चेचा विषय राहिली. तसे ऐंशीच्या दशकानंतर पोलीस महासंचालक पदावरील व्यक्तीला एक सव्वा वर्षापेक्षा अधिकच कालावधी मिळालेला नाही. यालाही अरविंद इनामदार किंवा पी एस बासरीचा यांच्यासारखे अधिकारी अपवाद आहे, नाही असे नाही.

 

 

 

मात्र कालावधी किती मिळेल यापेक्षाही या कालावधीत या अधिकाऱ्यांनी एक वेगळा ठसा उमटवला. पोलीस दलात काम करताना सत्ताधाऱ्यांचे ऐकावेच लागते. कोणी कितीही म्हटले तरी वरिष्ठ पदावर काम करताना 'राजकीय दबाव ' आणि 'राजकीय हस्तक्षेप ' असतोच. अगदी नियुक्त्या, बढत्या, बदल्या आणि आता तर दैनंदिन कामात देखील तो वाढला आहेच. मात्र हे सारे असताना , तो दबाव किती स्वीकारायचा आणि त्यात वाहवत जाऊन सामान्यांच्या अधिकारांचे किती नुकसान करायचे हे ठरविण्याची ही वेळ आहे. हे सांगण्याचा हेतू हाच की रश्मी शुक्ला या वरिष्ठ  अधिकारी आहेत, मात्र त्यांच्याबाबत त्या देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमधल्या असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर गुप्य्वार्ता विभागात असताना विरोधीपक्षातील लोकांचे फोन टॅप केल्याचा आरोप झालेला होता. या प्रकरणात पुढे पुणे पोलिसांनी क्लोझर रिपोर्ट दिला हा भाग वेगळा . पण प्रमुख पदावरील व्यक्तीने वादातीत असावे लागते, किमान तसे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता रश्मी शुक्ल यांना आपल्यावर झाले ते आरोपच होते, आणि आपण देखील पोलीस महासंचालक पदाचा गौरवशाली आणि तटस्थ वारसाच पुढे नेऊ हे प्रत्यक्ष कृतीतून राज्याला दाखवावे लागेल. यासाठी त्यांना शुभेच्छा. भलेही त्यांच्या सेवेची सहा महिनेच राहिली असतील, मात्र आपल्याकडे सोयीच्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रघात आहेच. आणि त्यापुढे जाऊन काही विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी थेट अध्यादेश काढून कायदा बदलण्याचा पायंडा देखील केंद्राने पाडला  आहेच. 

Advertisement

Advertisement