बीड-जिल्ह्यात सुरू असलेल्या 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेचा बागूलबुवा उभा केला जात आहे. यावेळी प्रथमच निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीच्या लगतच्या गावामध्येही आचारसंहिता लावण्यात आली आहे. हे करताना प्रशासनाने चक्क शिरूरच्या नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू केली होती. हे करण्यात चुक झाल्याची उपरती प्रशासनाला व्हायला तब्बल 15 दिवस लागले. अखेर मंगळवारी जिल्हाधिकार्यांनी शिरूर नगर पंचायतला लागू केलेली आचारसंहिता मागे घेतली आहे.
बीड जिल्ह्यात 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी ग्रामपंचायतसाठी आचारसंहितेची अंमलबजावणी करताना निवडणुक सुरू असलेल्या गावासोबतच लगतच्या ग्रामपंचायतमध्येही आचारसंहिता लागू करण्याच्या सुचना निवडणुक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकार्यांनी 129 ग्रामपंचायतींसह लगतची 352 गावे जोडून तब्बल 481 गावांमध्ये आचारसंहिता लागू केली होती. विशेष म्हणजे हे करताना कान्होबाचीवाडी ग्रामपंचायतीसाठी चक्क शिरूर नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. नागरी क्षेत्रात ग्रामपंचायतची आचारसंहिता लागू होत नसतानाही जिल्हाधिकार्यांनी तसे आदेश काढले होते.
मात्र तब्बल 15 दिवसानंतर जिल्हाधिकार्यांना आपल्या निर्णयाची उपरती झाली असून शिरूर कासार नगर पंचायतमध्ये नजरचुकीने आचारसंहिता लागू केल्याचे सांगत मंगळवारी (दि.29) जिल्हाधिकार्यांनी शिरूरसाठी लावलेली आचारसंहिता मागे घेतली आहे. मात्र शिरूर नगर पंचायतधमध्ये या पंधरा दिवसात आचारसंहितेच्या नावाखाली जी कामे ठप्प पडली त्याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
प्रजापत्र | Wednesday, 30/12/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा