धाराशिव दि.९(प्रतिनिधी): राज्यात वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यभर ९ मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.राज्यात सध्या १४ लाखांहून अधिक ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने देण्यात आलेले आहेत. वाढत्या वाहनसंख्येमुळे अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
महाराष्ट्रातील ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. या संदर्भात परिवहन मंत्र्यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने कोणत्या निकषांवर द्यावेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून त्यानुसार पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे.नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन लवकरच आवश्यक धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
