बीड दि. ४ (प्रतिनिधी ) : सात महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत एकमेकांवर केलेली जहरी टीका, त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी झालेली हात मिळवणी या पार्श्वभूमीवर आता माजलगाव नगरपालिकेचे 'तुतारी'वर निवडून आलेले उपाध्यक्ष सहाल चाऊस यांचे नाव थेट राष्ट्रवादी (अजित पवार )पक्षाच्या आ. प्रकाश सोळंकेंच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याच्या बॅनरवर झळकले आहे. सोशल मीडियामध्ये हे बॅनर सध्या झळकत असून आज होत असलेल्या राष्ट्रवादीच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी (शप) चे सहाल चाऊस उपस्थिती लावणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण गरम झाले आहे.
माजलगावच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्यातही सहाल चाऊस यांच्या राजकीय भूमिका हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. सात महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सहाल चाऊस आणि आ. प्रकाश सोळंके राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात आक्रमकपणे उभे थकल्याचे चित्र होते. सहाल चाऊस यांचा पॅनल राष्ट्रवादी (शप ) कडून तर आ. सोळंके समर्थित पॅनल राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. यात तुतारीकडूनच सहाल चाऊस यांच्या कुटुंबात नगराध्यक्षपद आले तर तुतारी चिन्हावरच स्वतः सहाल चाऊस नगरसेवक देखील झाले. त्या निवडणुकीत चाऊस आणि सोळंके यांच्याकडून एकमेकांवर जहरी टीका झाली होती.
मात्र निवडणूक संपताच उपाध्यक्षपदासाठी आपल्याच पक्षातील विरोध मोडून काढण्यासाठी सहाल चाऊस यांनी थेट आ. प्रकाश सोळंके यांच्याशीच हातमिळवणी केल्याचे चित्र माजलगावमध्ये पाहायला मिळाले होते. स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी देखील सोळंके चाऊस यांच्या राजकीय मैत्रीची चर्चा झाली होतीच.
या सर्व पार्श्वभूमीवर आता आज माजलगावमध्ये होत असलेल्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट ) एसआयआर जागृती मेळाव्याच्या उपस्थितांमध्ये थेट सहाल चाऊस यांचे नाव झळकले आहे. सहाल चाऊस हे राष्ट्रवाद्यांची (शप ) चे अधिकृत नगरसेवक असले तरी आ. सोळंकेंच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या आणि राष्ट्रवादी (अजित पवार ) च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादी (शप ) चे सहाल चाऊस हे एकमेव नाव आहे. मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु होत्या त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन समजण्यासारखे होते, मात्र आता त्या शक्यता संपलेल्या असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रजापत्र | Sunday, 05/07/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
