कडा : चालू मान्सूनच्या हंगामात पेरणीचे साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आष्टी तालुक्यातील दोन चुलत भावांवर काळाने भीषण घाला घातला आहे. अहिल्यानगर-सोलापूर रोडवरील वाळुंज पारगाव शिवारात रविवारी दुपारच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या हृदयद्रावक अपघातामध्ये दुचाकीस्वार वेदांत अशोक फंड (वय २०), रा. केरूळ, ता. आष्टी या तरुणाचा जागीच जागीच मृत्यु झाला. तर त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश बाबासाहेब फंड (वय २३) हा अत्यंत गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील रहिवासी असलेला वेदांत फंड आणि त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश फंड हे दोघेजण आपल्या शेतातील पेरणीचे आवश्यक साहित्य आणण्यासाठी रविवारी दुपारच्या दरम्यान दुचाकीवरून जवळच असलेल्या मिरजगावला गेले होते. मात्र, मिरजगाव बाजारपेठेत त्यांना अपेक्षित साहित्य मिळाले नाही. त्यामुळे ते दोघेही दुचाकीवरून अहिल्यानगर-सोलापूर हायवेने अहिल्यानगर शहराकडे जात होते. ते वाळुंज पारगाव शिवारानजीक आले असता, अहिल्यानगर बाजूकडून मिरजगावकडे प्रचंड वेगाने निघलेल्या एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. ट्रकचा हा धक्का इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि वेदांतचा जागीच करुण अंत झाला.अपघाताचा मोठा आवाज होताच महामार्गावरील इतर वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश फंड याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, सध्या डॉक्टर त्याच्या प्राणांची शर्थ करत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आणि वाहतूक पूर्ववत केली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
