Advertisement

 शेती करणाऱ्या तरुणांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर,मुलांनाच द्यावा लागतोय हुंडा

प्रजापत्र | Monday, 09/03/2026
बातमी शेअर करा

मुंबई दि.९(प्रतिनिधी): विधानसभेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणावर चर्चा सुरू असताना माजलगावचे आ.प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक सामाजिक प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. ग्रामीण भागात शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने आता मुलांच्याच कुटुंबांना हुंडा द्यावा लागत असल्याची धक्कादायक माहिती सोळंके यांनी सभागृहात दिली. प्रत्येक गावात २५ ते ३० वयोगटातील शेकडो तरुण केवळ शेती व्यवसायामुळे विवाहाविना असून ही सामाजिक दरी भयावह होत चालली आहे. या हतबलतेचा गैरफायदा घेऊन फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून बोगस मुलींच्या माध्यमातून तरुणांची लाखो रुपयांना लूट केली जात आहे. यामुळे ग्रामीण तरुण नैराश्यातून व्यसनाच्या आहारी जात असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या वास्तववादी परिस्थितीचा सखोल अभ्यास करून विशेष योजना आखण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

Advertisement