सी व्होटर संस्थेने केलेल्या सर्व्हेच्या निष्कर्षांमुळे इंडिया आघाडीला भलेही काहीसे बरे वाटले असेल, मात्र केवळ जनमत चाचण्यांमध्ये चित्र चांगले दिसते म्हणून हुरळून जाण्यासारखी परिस्थिती बिलकुलच नाही. इंडिया आघाडीचा मुकाबला सत्तेसाठी काहीही करू धजावणाऱ्या आणि कायम निवडणुकीच्या वातावरणात जगणाऱ्या भाजपशी आहे. जिथे भाजप आपली पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे तिथे अजूनही इंडिया आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाच ठरत नाही. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना इंडिया आघाडी जागा वाटपाचा घोळ किती लवकर मिरवीते यावर देखील खूप काही अवलंबून असणार आहे.
इंडिया आघाडीची जागावाटपासाठीची बैठक पार पडत असतानाच सी व्होटर या संस्थेने एका वृत्त वाहिनीसाठी केलेल्या जनमत सर्व्हेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत.या निष्करशनमधून भाजपच्या बेफाम उधळणाऱ्या वारूला देखील रोखता येऊ शकते हे समोर येत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात अजित पवार गटाला सोबत घेतल्यानंतरही अजूनही महायुतीला विरोधी महाविकास आघाडीच्या पुढे जाता आलेले नाही. आणि या निष्कर्षांमधील सर्वात महत्वाचे म्हणजे मागच्या निवडणुकीत काँग्रेसची जी अवस्था झाली होती , आणि सगळीकडेच काँग्रेस आकुंचन पावली होती, यावेळी तसे चित्र नाही. काँग्रेसला सर्वदूर संधी मिळेल, किमानपक्षी काँग्रेस सर्वत्र लढतिमध्ये आहे,असे दाखविणारे हे निष्कर्ष आहेत. यालाही उत्तरप्रदेशचा अपवाद आहेच,नाही असे नाही, पण तरीही काँग्रेस निव्वळच अदखलपात्र असणार नाही हे नक्की.त्याचवेळी इंडिया आघाडीसोबत असणाऱ्या घटक पक्षांना देखील पश्चिमबंगाल असेल किंवा बिहार , आपली शक्ती दाखविता येईल असा दिलासा या सर्व्हेक्षणाने नक्कीच मिळाला आहे. खरेतर या ओपिनियन पोलचा आनंद इंडिया आघाडीच्या बैठकीत दिसायला हवा होता, मात्र विरोधीपक्षांना अजूनही मोदी शहांच्या भाजपविरोधात तगडी एकजूट करणे जमत नसल्याचेच चित्र आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल कोणतेही एकमत झाले नाही. आणि आघाडीमधील सर्वात महत्वाची बाब हीच असणार आहे.
जागावाटपावरून काही नेते आक्रमक झालेले असताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी एक नवा फॉर्म्युला मांडला. राज्यांमधील प्रबळ पक्षांच्या नेत्यांनी संबंधित राज्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चेचे नेतृत्व करावे.या सूत्रानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी,बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, उत्तरप्रदेशात अखिलेश यादव व तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांनी जागावाटपाच्या चर्चेचे नेतृत्व करावे असा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. आता यावर सर्वच पक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे.पण जो काही निर्णय घ्यायचा, त्यासंदर्भात जर घाई केली गेली नाही, तर आघाडी मागे पडणार हे निश्चित.
मुळातच इंडिया आघाडीला ज्या भाजपचा सामना करायचा आहे, तो भाजप वेगळा आहे. नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा,हे कायम निवडणुकीच्या मूड आणि मोडमध्ये असतात. भाजपचे संघटनात्मक जाळे देखील मोठे आहे. मागच्या निवडणुकीत भाजपने जे यश मिळविले त्यामागे त्यांनी नेमलेल्या 'पन्नाप्रमुख' यांचे योगदान मोठे होते. आजघडीला तर भाजप लोकसभेच्या संदर्भाने कोणतीच रिस्क घ्यायला तयार नाही, त्यामुळेच वेगवेगळ्या राज्यातील नाराज नेत्यांनाही पक्षात पुन्हा सक्रिय करण्याच्या हालचाली सुरु आहेत. भाजपने आपले उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत.
त्यामुळे अशा भाजपसोबत लढायचे तर तितकीच तंगडी व्यूहरचना करणे अपेक्षित आहे. भाजपकडून सत्तेचा, यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरु आहेतच, ते आणखी वाढत जातील असे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी जर जागावाटपाचा घोळ लवकर मिटवू शकली नाही,तर चढाई करणार कधी? जागा वाटपानंतर उमेदवार निश्चित करायचे, ते जनतेपर्यंत पोहचवायचे आणि आघाडीच्या सर्वांनी म्हणून प्रचार यंत्रणा सक्रिय करायची, हे सारे करण्यासाठी आता इंडिया आघाडीची अवस्था 'रात्र थोडी सोंगे फार' अशी झालेली आहे.