महाविद्यालयात शिकायला म्हणून गेलेला आपला पोरगा नेमकं कुठे फिरतोय, कोणत्या समूहात जातोय आणि कशाचा भाग होतोय याची माहिती पालकांनी ठेवायलाच हवी.एखाद्या हिंसक आंदोलनात एखाद्याचे नाव आल्यानंतर 'आमचा पोरगा तसा नव्हताच हो' असे म्हणण्यात फारसा अर्थ नसतो. महाविद्यालयीन तरूणांना आपले करिअर कोणत्या गोष्टीमुळे धोक्यात येऊ शकते याची पुरेशी जाणीव नसेल तर पालकांनी ती करून द्यायला हवी. बीडच्या घटनेत ज्याप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काही अल्पवयीन देखील आरोपी म्हणून समोर आले आहेत, ते पाहता, तरुणांनी झुंडीचा भाग होण्याचा धोका प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे हे नक्की.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या ढालीआडून बीड जिल्ह्यात जे काही घडले, ते आंदोलक नव्हते तर समाजकंटक होते हे आता लपून राहिलेले नाही.या प्रकरणाला तीन चार दिवस उलटल्यानंतर आता पोलिसांची कारवाई अधिक गतिमान झाली असून पोलिसांनी मोठ्याप्रमाणावर धरपकड करायला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांनी जे आरोपी अटक केले आहेत,त्यांच्या संदर्भाने एक बाब यावेळी पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे ती म्हणजे, कधी नव्हे इतकी या आरोपींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ६० % पेक्षा अधिक तरुण १८ ते २५ या वयोगटातले आहेत.म्हणजे खऱ्याअर्थाने ज्यांचे करिअर अद्याप सुरु व्हायचे आहे असा तो वर्ग आहे. काही आरोपी तर चक्क अल्पवयीन आहेत.आता अशा विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला आणि जमावाने दंगल पसरविणे असे गुन्हे दाखल झाल्यानंतर यांचे पुढचे भवितव्य काय असणार आहे ?
ज्यावेळी पोलिसांनी कारवाई सुरु केली, त्यानंतर अनेकांचे पालक आता 'आमचा पोरगा तसा नाही हो' असे म्हणत आहेत.गुन्हे मागे घेतले जावेत म्हणून धडपडत आहेत. आपल्या लेकराला असल्या काही प्रकरणात पकडले जातेय यावर त्यांचा विश्वास बसायला तयार नाही. पालक म्हणून त्यांचे असे वाटणे खरे असेलही कदाचित,मात्र आता हे जे काही सुरु आहे,ती पश्चातबुद्धी ठरणार आहे. मुळात शाळा, महाविद्यालयात जाणारा आपला पोरगा कोणत्या संगतीत आहे, त्याचे मित्र कोण आहेत, तो कोणाच्या प्रभावाखाली आहे याची माहिती घेणे पालकांनी बंद केलेले आहे. तर काही ठिकाणी 'आता पोरगा मोठा झालाय , त्याला प्रत्येकवेळी आपण काय सांगणार, त्याचे त्याला कळत असेलच' या भावनेतून पालकांनी पाल्यांकडे केलेले दुर्लक्ष कोणत्या वळणावर जाऊन पोहचू शकते हे बीडच्या घटनेने समोर आले आहे.
मुळात १८ ते २५ हा वयोगट फार लवकर कोणाच्याही प्रभावाखाली येणार असतो. त्याची विवेकी विचार करण्याची क्षमता तितकीशी विकसित झालेली नसेल, तर मग आपण कशाचा भाग होत आहोत हे कळण्याच्या अगोदरच, काहीतरी विपरीत घडून जाते अशीच परिस्थिती आजकाल निर्माण झालेली आहे.मागच्या १५-२० वर्षांपूर्वी त्यावेळी तरुण असलेल्या ज्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल झाले होते,त्यांचे हाल आज काय आहेत याचा देखील विचार तरुणानीने करणे आवश्यक असून पालकांनी देखील एकदा तरी आपल्या पाल्याला हे समजावून सांगणे आवश्यक आहे. आज किती पालक आणि पोरांमध्ये तो संवाद होतो हा संशोधनाचा मुद्दा आहे.
तरुणाईने सामाजिक प्रश्नांवर भूमिका घ्यायला हवी, चळवळींमध्ये सहभाग घ्यायला हवा, स्वतःची राजकीय , सामाजिक जाणीव विकसित करायला हवी, याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. मात्र हे करताना आंदोलन आणि हिंसक आंदोलन,सनदशीर मार्ग,संवैधानिक मूल्ये याची जाणीव अधिक जोरकसपणे विकसित करण्याची आवश्यकता आहे. आणि हे होतेय हे पालकांनी देखील पाहायला हवे.नाहीतर पश्चताप करण्यापलीकडे हाती काहीच उरणार नाही.