नवी दिल्ली - महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या राजकारणातला आज (सोमवार) महत्त्वाचा दिवस आहे. मागील अनेक महिन्यांपासून खोळंबलेली सुनावणी आज होतेय. सुप्रीम कोर्टामध्ये CJI चंद्रचूड यांच्यासह इतर न्यायाधीशांसमोर दोन सुनावण्या लागोपाठ होतील.
मागच्या वर्षी शिवसेना पक्षामध्ये मोठं बंड झालं. पक्षाचे ४० आणि १० अपक्ष आमदार घेऊन एकनाथ शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी केली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाने १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली होती. मात्र त्याप्रकरणात कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली.
मागील अनेक महिन्यांपासून रखडलेली या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होत असून विधानसभा अध्यक्षांना याप्रकरणी योग्य ते निर्देश देण्यासंबंधी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा सुनावण्या झालेल्या आहेत तेव्हा राहुल नार्वेकरांकडून काहीतरी कार्यवाही झालेली आहे.
दुसरं प्रकरण निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दिल्याने आयोगाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केलेली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्याने सुप्रीम कोर्ट त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार का? हे पाहावं लागेल.
सीजेआय धनंजय चंद्रचूड, जेबी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या कोर्टासमोर लागोपाठ दोन्ही सुनावण्या होणार आहेत. कोर्ट क्रमांक १८ आणि १९ मध्ये या सुनावण्या होतील. त्यामुळे ठाकरे गट आणि राज्यातील सत्तासंघर्षासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.