Advertisement

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी परळीची बाजारपेठ सज्ज

प्रजापत्र | Thursday, 14/09/2023
बातमी शेअर करा

परळी - सिंहासनावर आरूढ.. कमळावर बसलेला.. बाल गणेश.. लालबागचा राजा, सिद्धिविनायक, कोकणचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई.. अशा गणरायांच्या विविध रूपांनी अवघा रंग एकच झाल्याची अनुभूती परळी बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघ्या चार दिवस अवधी शिल्लक असताना बाजारपेठेत गणरायाची मूर्ती निश्चित करण्यापासून ते सजावटीचे साहित्य खरेदी करण्यापर्यंत भक्तांची गर्दी झाली आहे.  

 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे पांडुरंग मूर्ती स्टॉलचे संचालक श्री रामेश्वर खर्डे यांनी सांगितले. गणरायाचे आगमन होताच वातावरण आनंदी होते. बाप्पांच्या स्वागताला गणेशभक़्त सज्ज झाले आहेत. त्यासाठी उत्सवाला लागणारे सजावटीचे साहित्य, नवनवीन रंगीबेरंगी मखर, लाईटींग तसेच पुजाविधीच्या वस्तुंची दुकाने ठिकठिकाणी गणेशभक्तांनी गजबजली आहेत. परळी शहरासह राज्यात दुष्काळाचे सावट असले तरी गणेशभक्तांचा उत्साह काही कमी झाला नाही, हे विशेष. दुष्काळाचे सावट असतांना देखील मोठ़या उत्साहात गणपतीची तयारी सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर दुकानांवर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असल्याने शहरातील बाजारपेठेत सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.  सजावटीसाठी रंगीबेरंगी थर्माकॉलचे मखर, चमकी आदींचा समावेश आहे. व्यावसायिकांनी मोंढा मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैद्यनाथ मंदिर, राणी लक्ष्मीबाई टावर, नेहरू चौक, गणेश पार रोड, स्टेशन रोड आदी परिसरात दुकाने थाटली आहेत.  सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणपतीच्या देखाव्यांची तयारी अद्याप सुरू असून मंडळांचे कार्यकर्ते दंग आहेत. गणेशाच्या आगमनासाठी मोठा उत्साह संचारला आहे.  बाजारपेठेत यंदा  विविध गणेशमूर्तींना भाविकांकडून मोठी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement