धाराशिव: जिल्ह्याच्या तुळजापूर (Dharashiv) तालुक्यातील केशेगाव येथे विजेच्या धक्क्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये वडील, मुलगा आणि दोन मजुरांचा समावेश आहे. गावातील गणपत साखरे यांच्या शेतात (Farmers) विहिरीतील मोटार काढण्याचं काम सुरू होतं. क्रेनच्या सहाय्याने ही मोटार बाहेर काढली जात असताना क्रेनचा वरील भाग महावितरणच्या विद्युत हायव्होल्टेज तारेला स्पर्श झाल्याने क्रेनमध्ये करंट उतरल्याची धक्कादायक घटना घडली. त्यात, मोटार काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेनं परिसरात हळहळ पसरली आहे.
क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील मोटर काढत असताना विजेचा धक्का लागल्याने शेतकरी कुटुंबातील बाप-लेकासह शेतातील मजूरांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एकाच वेळी चार जणांचा बळी गेल्याने गावात शोककळा पसरली असून तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. दुर्घटनेतील सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेत कासीम कोंडिबा आणि त्यांचा 16 वर्षीय मुलगा रतन कासिम या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, रामलिंग साखरे यांच्यासह त्यांचे वडिल नागनाथ साखरे याही बापलेकााच दु्र्दैवी अंत झाला. दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
अपघाती घटनेतील मृतांची नावे
कासिम कोंडिबा फुलारी (वय 54)
रतन कासिम फुलारी (वय 16)
रामलिंग नागनाथ साखरे (वय 30)
नागनाथ साखरे (वय 55)

