मुंबई - राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस तिकीट आणि सवलतीसाठी आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेशी करार केला आहे. यासाठी लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
एसटी बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी आदी सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोटे ओळखपत्र आणि कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे महामंडळ निदर्शनास आले होते. आता योग्य प्रवाशालाच सवलतीचा लाभ घेता यावा, तसेच व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. त्यामुळे सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत.
कोणाला मिळणार कार्ड?
विद्यार्थी : शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिक व महिला : अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.
दिव्यांग प्रवासी : यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.
पुरस्कारार्थी व पत्रकार : स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण.
अधिकृत एजंटची नियुक्ती
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

