Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - आत्महत्या नाही पर्याय

प्रजापत्र | Friday, 08/09/2023
बातमी शेअर करा

हक्कांसाठी लढणे,संघर्ष करणे समजू शकते.आंदोलनांच्या माध्यमातून समाजमन जागे करणे देखील योग्यच आहे.पण आपल्या हक्कासाठी थेट जीवन संपविणे याचे समर्थन करता येणार नाही.ज्यांनी मराठा आरक्षणासाठी जीव दिला त्यांच्या भावनेची कदर असली,तरी असे प्रश्न केवळ भावनिकतेने सुटत नसतात.आत्महत्या हाच जर आरक्षण मिळविण्याचा मार्ग असता तर जेंव्हा आमदार असलेल्या अण्णासाहेब पाटील यांनी आत्मार्पण केले,तेव्हाच खरेतर आरक्षण मिळायला हवे होते,पण तसे होत नसते.म्हणूनच मराठा समाजातील तरुणाईने भावनिक होण्याऐवजी संवैधानिक संघर्षाचा मार्ग चालण्याची गरज आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला दहा दिवस उलटून गेले आहेत.त्यांचे उपोषण,त्यानंतर उपोषणस्थळी आवश्यकता नसताना पोलिसांनी केलेला लाठीमार आणि त्यानंतर राज्यभरात,विशेषतः मराठवाडयात त्याचे उमटत असलेले पडसाद पाहता राज्य सरकार आंदोलकांसमोर गुडघ्यावर आले आहे.कोणी काहीही म्हणत असले तरी आज मराठा आरक्षणाचे इतके त्रांगडे झाले आहे की हा विषय एका क्षणात मार्गी लावण्यासारखा राहिलेला नाही.मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीवर देखील सरकार काम करत असले तरी आता सरकारने ठरवले आणि उद्याच सरसकट प्रमाणपत्र मिळाले असेही होत नसते.प्रत्येक बाबीला निश्चित अशी प्रक्रिया असते,ती पार पाडली गेली नाही तर आजचे निर्णय उद्या टिकत नाहीत ही बाब समाजातील धुरीणांनी आ़दोलनकर्त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे.
आज मराठा आरक्षण आंदोलन एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचले आहे.या आंदोलनामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत,सरकार हादरले आहे. आताच काही तरी होईल अशी परिस्थिती आहे,हे सगळे खरे असले तरी आरक्षणासाठी महाराष्ट्रात सुरु झालेल्या तरुणांच्या आत्महत्या मात्र वेदनादायी आहेत.मागच्या काळात ठोक मोर्चाचे आंदोलन सुरु झाले त्यावेळी देखील असेच आत्महत्यांचे लोन राज्यभरात पोहचले होते.त्यावेळी राज्यात चाळीसच्या आसपास तरुणांनी जीव दिला होता.आता पुन्हा मराठा तरुणांच्या आत्महत्या सुरु झाल्या आहेत.यामागे तरुणाईची भावना समाजासाठी आत्मबलीदान करण्याची आहे असे मान्य केले तरी आत्महत्या हा आरक्षण मिळविण्याचा मार्ग नाही.ज्याने आत्महत्या केली,त्याचे कुटुंब वाऱ्यावर पडते.समाज काही काळ त्या कुटूंबाची काळजी घेईलही,कदाचित आर्थिक संकटं मागे राहिलेल्यांवर येणार नाहीत असे समजू,पण त्या कुटूंबाच्या भावनिकतेचे काय? ज्या कुटूंबातील तरुणाने आपले जीवन संपविले त्याची त्या कुटूंबातील मुलाची,बापाची,भावाची जागा कोण घेणार? बरे आत्महत्या केल्याने हा प्रश्न लगेच सुटणार आहे का? तर तसेही नाही. आणि जर अशाच तरुणांनी आत्महत्या करायच्या असतील तर आरक्षण तरी कोणासाठी मिळवायचे आहे.समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा असणे चांगले आहे.पण हे काही तरी म्हणजे जीवन संपविणे असू शकत नाही.आरक्षणाच्या विषयावर संवैधानिक संघर्ष अधिक बळकट करण्यासाठीची भूमिका तरुणाईने घ्यायला हवी.आणि हीच बाब आंदोलनाच्या नेत्यांनी,समाजातील धुरीणांनी सर्वत्र पोहचविणे हे त्यांचे सामाजिक दायित्व आहे.
आज आरक्षण आंदोलन एका वळणावर आहे.त्यातून जे निर्णय होतील त्यांना फलनिष्पत्ती पर्यंत पोहचायला वेळ लागणार आहे.कोणत्याही प्रक्रियेशिवाय आज जर शासनाने काही आदेश काढले तर ती केवळ समाजाची दिशाभूल ठरेल.आज आपण जिंकल्याचा क्षणिक आनंद सहन करता येईलही,पण उद्या ते निर्णय कायद्याच्या,संविधानाच्या कसोटीवर टिकले नाहीत तर? याचाही विचार आंदोलकांनी करावा.आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे,पण हे करताना ते समाजाला धरुन राहिलं हे देखील पाहिले जाणे आवश्यक आहे,आणि यातून तरुणाईची अकाली पानगळ होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी आपली सर्वांची,प्रत्येक घटकाची आहे.

Advertisement

Advertisement