शिक्षक या पेशाला समाजात आदराचे स्थान होते, हा आता इतिहास झाला आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. तसे तर सर्वच क्षेत्रांची अवस्था कमीअधिक फरकाने अशीच झाली आहे. पण शिक्षकांना काही दशकांपूर्वी गुरु म्हणून मिळणारी वागणूक आणि आज सहजपणे शिक्षकांबद्दल व्यक्त होणाऱ्या भावना याचा विचार सर्वच शिक्षकांनी करण्याची आवश्यकता आहे. पूर्वी शिक्षक म्हणजे समाजाला जोडणारा सेतू होता आता शिक्षक आणि समाज यांच्यामध्येच मोठी दरी निर्माण झाली आहे.
आज शिक्षक दिन. त्या निमित्ताने सर्व शिक्षक बांधव, भगिनींना शुभेच्छा . शिक्षकांचे समाजाच्या उभारणीत योगदान कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही. मात्र मागच्या काही दशकात या क्षेत्राचे जे काही प्रमाणात अधःपतन झाले आहे, होत आहे त्याचे चिंतन नाही, तरी किमान चिंता तरी केली जावी अशी परिस्थिती आहे. खरेतर आजचा दिवस शिक्षकांच्या गौरवाचा , त्यामुळे आज काही वेगळे बोलावे असे नाही, मात्र गौरवाचे युग टिकवायचे असेल तर त्यासाठी आत्मचिंतन देखील लागतेच.
मागे काही महिन्यांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते, त्यात शिक्षकांचा सहभाग मोठा होता आणि त्या आंदोलनाच्या बाबतीत सामान्यांच्या ज्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या, त्या बहुतांशी शिक्षकांच्या संदर्भाने होत्या. तेच आंदोलन कशाला , शिक्षकांची ज्या ज्या वेळी आंदोलने होतात , त्या त्या वेळी समाजाची सहानुभूती त्यांना फारशी मिळत नाही. ज्यावेळी एसटीचे कर्मचारी आंदोलन करीत होते, त्यावेळी सामान्यांची गैरसोय होत असतानाही समाजाची सहानुभूती मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने होती, तशी सहानुभूती आता शिक्षकांना का मिळत नाही , याचा विचार शिक्षक म्हणून व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाने आणि शिक्षक संघटनांनी देखील घ्यायला हवा. मागे आ. प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या संदर्भाने काही विधाने केली, त्यातील वास्तव परिस्थिती काय यात आज पडण्याचे काहीच कारण नाही, मात्र त्या वक्तव्याचे देखील समाजाला वाईट वाटले असे नाही, त्या वक्तव्याचा निषेध शिक्षक संघटनांमधून झाला, पण समाजाचे काय ?
हा काही फार जुना इतिहास नाही, अगदी तीन चार दशकांपूर्वीपर्यंत कशाला , मागच्या दोन दशकांच्या अगोदर देखील शिक्षकांना समाजात प्रचंड आदराचे स्थान होते . आजही चाळीशीच्या घरातील पिढीचा शिक्षक समोरून आले तर आदराने माथा झुकतो . आजही अनेक ठिकाणी शिक्षकाची बदली झाली, तर सारा गाव रडतो असे सन्माननीय अपवाद आहेत, नाहीत असे नाही, मात्र त्याचे सार्वत्रिकीकरण होताना दिसत नाही. शिक्षण क्षेत्राबद्दल प्रचंड आदर व्यक्त करणारे लोक देखील जेव्हा विषय शिक्षकांचा येतो, त्यावेळी फारसे आदराने बोलत नाहीत हे वास्तव आहे. कमीअधिक फरकाने सर्वच क्षेत्रांकडे पाहण्याचा, अगदी माध्यमांकडेही , समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे हे मेनी केले तरी शिक्षण क्षेत्राबद्दल समाज जो उदासीन झाला आहे, ती उदासीनता घालविण्यासाठी शिक्षकानीच पुढाकार घ्यावा लागेल. पूर्वी गावातल्या लोकांना शिक्षक मार्गदर्शक वाटायचं, आज मात्र शिक्षक आपल्यातही वाटत नाही, ही जी दरी शिक्षक आणि समाज यांच्यामध्ये निर्माण झाली आहे, त्याच्या कारणांचे मंथन केले जाणार आहे की नाही ? यावर देखील विचार व्हायला हवा.
या साऱ्या परिस्थितीला केवळ शिकत जबाबदार आहेत असेही नाही. याला अनेक घटक कारणीभूत आहेतच. राज्याचे शैक्षणिक धोरण, शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, अनेकवेळा कोणत्याही राष्ट्रीय कामासाठी शिक्षकांनाच अगदी 'जुंपले ' जाते असे म्हणावे अशी परिस्थिती आहेच. मध्यंतरी कॅट्रॉनाच्या काळात तर बीड जिल्ह्यात एका जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना चक्क किराणा वाटपाचे काम लावले होते, शिक्षकांना तपासणी नाक्यावर उभे करण्यात आले होते, हे सारे व्हायला नकोच. त्यासोबतच कायम विनाअनुदान धोरणामुळे निर्माण केलेले अनेक प्रश्न आहेतच, त्याचो सोडवणूक होताना दिसत नाही. हे सारे प्रश्न सुटले पाहिजेतच . मात्र त्यासोबतच या प्रश्नांपलीकडे जाऊन शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्षक संघटना केव्हा बोलणार आहेत? शिक्षक पतसंस्थांच्या निवडणुका विधानसभा निवडणुकांना लाजवतील अशा होतात यावर संघटना आणि शिक्षक बोलणार आहेत का ? आणि असे होणार नसेल तर शिक्षक आणि समाजमधली दरी कमी कशी होईल ?