मराठा आरक्षण आंदोलनावरून सुरू झालेल्या संघर्षाने राज्यभरात आक्रोशाचा भडका उडालेला आहे. अजूनही अनेक ठिकाणी एसटीची चाक थांबलेली आहेत. जाळपोळ सुरू आहे. समाज मन अस्वस्थ आहे.आणि हे सारं सुरू असलं तरी मायबाप सरकार मात्र ‘सरकार आपल्या दारी’चे सोहळे थांबवायला तयार नाही. आरक्षण आंदोलनावरून सारा महाराष्ट्र पेटलायं, मराठवाडा या आंदोलना सोबतच दुष्काळाने देखील होरपळतोय. मात्र सरकारला केवळ स्वत:च्या जाहिरातबाजीचे पडले आहे. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता ही जी म्हण आहे त्याचा प्रत्यय आज महाराष्ट्रातल्या नागरिकांना येतोय.
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांच्या सरकारला अजित पवारांच्या गटाचा डब्बा जोडला गेल्यानंतर या सरकारने स्वत:च्या टिमक्या वाजविण्याचा उपक्रम अधिक जोरात सुरू केला आहे. ठिकठिकाणी प्रशासनाला सक्ती करून माणसं जमवायला लावायची आणि त्यांच्यासमोर शासन आपल्या दारीच्या नावाखाली सरकार काय काय करतयं हे सांगायचं असा हा सारा कार्यक्रम आहे. साध संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान मंजुरीचे पत्र घेण्यासाठी लोकांना आपल्या जिल्ह्यात हा कार्यक्रम कधी होतो याची वाट पहावी लागत आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी जिल्हाभरातून जनता जमवायची. त्यांना फार तर एखादा बिस्कीट पुडा किंवा एखादा वडापाव खाऊ घालायचा आणि त्यांच्यासमोर सरकारच्या कथित कर्तृत्वाचे पोवाडे गायचे असा हा सारा कार्यक्रम. इतर वेळी अशा कार्यक्रमांना आक्षेप घ्यायचे फारसे काही कारण नव्हते. कारण उद्या कोणतेही सरकार आले तरी ते आता असल्या सगळ्या चमकोगिरीला अपवाद राहीलेले नाही.
मात्र सत्तेमध्ये बसल्यावर सत्ताधार्यांच्या संवेदना किती बोथट होतात हे आज महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आंदोलनावरून आज सारे राज्य पेटले आहे. अनेक ठिकाणी एस.टीची चाक जागच्या जागी थांबल्यामुळे सामान्यांना प्रचंड आपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. साधं औरंगाबादहून बीडला यायचं तर पाचोडवरून पैठणला जा, तिथून पाथर्डीला जा आणि मग बीडला या . असा द्राविडी प्राणायाम करण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे. ठिकठिकाणी मराठा समाजाचा असंतोष रस्त्यावर येतोय आणि असे असतानाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र ‘शासन आपल्या दारी’च्या टिमक्या वाजविण्यात मग्न आहे. आंदोलकांचा रोष असल्यामुळे हवाई मार्गे का होईना कार्यक्रमस्थळी पोहचण्याचा अट्टाहास मुख्यमंत्र्यांचा आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या दिमतीला सार्या यंत्रणा हात जोडून उभ्या आहेत त्यामुळे ते हवाई मार्गेच काय तर कसेही येतील पण सामान्याचं काय? सारा महाराष्ट्र जळत असताना ‘शासन आपल्या दारी’चा हा अट्टाहास नेमकी कोणती मानसिकता सांगणारा आहे? जालना जिल्ह्यात रोष जरा जास्तच असल्यामुळे या जिल्ह्यातील कार्यक्रमाची तारीख बदलली मात्र बुलढाणा जिल्ह्यात लोक काळे झेंडे दाखवत असतानाही मंत्री गाड्या उडवत आहेत. बुलढाण्याच्या शेजारचाच मराठवाडा दुष्काळाच्या आगीत होरपळतोय. तेथील शेतकर्यांना काही द्यावं अस सरकारला वाटत नाही. मात्र टिचभर कामांच्या फुटभर घोषणांचे ढोल वाजविण्यात हे सरकार मग्न झाले आहे. खर्या अर्थाने रोम जळत असताना फिडेल वाजविणार्या निरो राजासारखी अवस्था आज महाराष्ट्रातल्या सत्ताधार्यांची आहे.