Advertisement

संपादकीय अग्रलेख - आंदेकरांना एक न्याय,मुंडेंना वेगळा अजित पवारांचे दुटप्पी राजकारण

प्रजापत्र | Monday, 05/01/2026
बातमी शेअर करा

बीड जिल्ह्यात येऊन राजकीय गुन्हेगारीवर बोलणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात मात्र आंदेकर कुटुंबातील दोघांना उमेदवारी दिली.उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी अजित पवारांचा  विषय,मात्र या उमेदवारीचे समर्थन करताना अजित पवार जे बोलले त्यामुळे त्यांच्याच विधानावर भाष्य करणे भाग आहे.'एखाद्याच्या कुटुंबातील कोणी मर्डर केला,म्हणून त्याचा दोष साऱ्या कुटुंबाला कसा द्यायचा,कुटुंबातील इतरांना दोष कसा देता येईल? ' हा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.मग अजित पवारांचा हा न्याय योग्य असेल तर बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंसारख्या नेत्यावर राजकीय विजनवासाची वेळ अजित पवार कोणत्या न्यायाने आणतात?अजित पवारांची पुण्यातली भूमिका योग्य का बीडची ?

कोणतेही राजकीय नेतृत्व तयार व्हायला खूप वर्ष जावी लागतात,त्यामुळे कोणत्याही राजकीय,सामाजिक व्यक्तिमत्वाबद्दल कोणती भूमिका घेताना केवळ अतिउत्साहात किंवा उन्मादात घेता येत नसते,घेतली देखील जाऊ नये.कारण या भूमिकेचे परिणाम केवळ त्या व्यक्तीवर होत नसतात तर एकूणच समाजव्यवस्थेवर,त्या भागावर देखील होत असतात.आ.धनंजय मुंडेंच्या संदर्भाने मागच्या एक वर्षात ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यामध्ये त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही भूमिका होती,त्याबद्दल आता भाष्य करावेच लागेल अशी वेळ खुद्द अजित पवारांनीच आणली आहे.
मुळात संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप सिद्ध होतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी भूमिका 'प्रजापत्र' ने वारंवार मांडली आहे.फक्त हे सारे न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून व्हायला हवे,समाज माध्यमांमधील झुंडीच्या माध्यमातून नाही असेच अपेक्षित आहे.हे सारे करताना वाल्मिक कराडचा संबंध जोडत मागच्या वर्षभरात अनेकांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले.विरोधी पक्षातील लोकांनी हे करावे,यात काही आश्चर्य नाही, राजकारणात विरोधकांना अडविण्याची संधी कोणी सोडत नसतो,देशमुख कुटुंबाला आ.धनंजय मुंडे राजकीय दृष्ट्या पुन्हा उभारी घेऊ नयेत असे वाटणे देखील एकवेळ मनुष्य स्वभाव म्हणून समजण्यासारखे आहे,मात्र खुद्द धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादीने त्यांना टार्गेट करावे हे समजण्यासारखे नव्हते.आता पुण्यात स्वतः अजित पवार जर 'एखाद्याने कोणाचा मर्डर केला तर त्याच्या कुटुंबातील इतरांना दोष कसा देता येईल ? 'अशी भूमिका घेत आहेत.भूमिका म्हणून किंवा नैसर्गिक न्यायाचे तत्व म्हणून यात काही चुकीचे आहे असे देखील नाही.एकाच्या कृत्याचा दोष दुसऱ्याला देता येत नसतो,दिला देखील जाऊ नये,मात्र अजित पवारांनी ही जी भूमिका आंदेकरांच्या उमेद्वाऱ्यांचे  समर्थन करताना घेतली आहे, ती भूमिका अजित पवारांनी मागच्या वर्षभरात का घेतली नाही?
महायुतीच्या सत्तेत मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेताना त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल नव्हता किंवा आता वर्षभरानंतरही कोणत्या गुन्ह्यात त्यांचा थेट संबंध समोर आलेला नाही.समाज माध्यमांवरील झुंडींना हे रुचणारे नसले तरी हे वास्तव आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा काय तो निकाल न्यायालय देईलच,पण आज पुण्यात 'एखाद्याच्या गुन्ह्याची शिक्षा कुटुंबाला का ?' असे म्हणणारे अजित पवार आपल्याच पक्षाच्या एका तरुण आणि कर्तृत्ववान नेत्याला हेटाळणी आणि राजकीय विजनवासाला सामोरे जावे लागत असताना शांत का बसलेले आहेत,किंबहुना या साऱ्या प्रकाराला मूक समर्थन तर देत नाहीत ना ? एखाद्या व्यक्तीमुळे एका संपूर्ण जातिसमूहाला बदनाम केले जात असताना अजित पवार पुण्यातले तत्वज्ञान बीडमध्ये येऊन सांगण्याचे धारिष्ट्य का दाखवित नाहीत ? का केवळ राजकारण म्हणून स्थलकालपरत्वे भूमिका घेणारांमध्ये आता अजित पवारांचा देखील समावेश झाला आहे ?
या ठिकाणी आम्हाला कोणत्याही खटल्यावर काहीही भाष्य करायचे नाही,धनंजय मुंडे काय कोणत्याही राजकीय नेत्याच्या बाबतीत 'नेतृत्व घडायला फार वेळ लागतो,खूप काही खर्ची करावे लागते,त्यामुळे राजकारण,समाजकारणातील कोणतेही नेतृत्व जपले गेले पाहिजे  हीच आमची भूमिका राहिलेली आहे.हे सारे काहींना रुचणार नाही आणि काहींचे पित्त यामुळे खवळेल याची देखील आम्हाला जाणीव आहे, मात्र कधीतरी वास्तव काय हे कोणीतरी बोलले पाहिजे.अजित पवार एखादी भूमिका पुण्यात घेत असतील तर राज्यातल्या बीडसह इतर भागांमध्ये त्यांनी तशी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा करण्यात चुकीचे काय ? महाराष्ट्राच्या राजकारणात खुनाचे आरोप असलेल्या किंवा गुन्हे सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांमध्ये उमेदवाऱ्या दिल्या जाण्याची उदाहरणे काही कमी नाहीत,पण राजकारणात सारेच सोयीचे आणि स्वतःला फायदेशीर असेल इतकेच बोलत असताना त्या साऱ्या 'गॉसिप' चा भाग अजित पवारांनी देखील व्हावे ? आणि स्वतःच्याच पक्षात राजकारणात दुटप्पी भूमिका घ्यावी याचा अर्थ नेमका काय ?

Advertisement

Advertisement