केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्याच्या मोठ्या भागात आज घडीला दुष्काळी चित्र आहे. ऑगस्ट महिना संपलेला असताना सिंचन प्रकल्प कोरडे आहेत आणिशेतांमधून आजही धूळच उडत आहे. केवळ शेतकऱ्यांना मदत करणे इतकाच विषय राहिलेला नाही, तर पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी असणार आहे. टँकरने पाणी पुरवठा करायचा म्हटले तरी टँकर भरायचे कोठून हा मोठा प्रश्न असेल अशी परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. चारा टंचाईच्या झळा देखील एखाद्या महिन्यात जाणवू लागतील , उसाच्या उत्पादकतेवर परिणाम झालेला असल्याने साखरेचा हंगाम देखील पूर्ण होईल का नाही अशी परिस्थिती आहे, त्यामुळे पुन्हा रोजगाराचा प्रश्न आहेच, अशा अनेक आघाड्यांवर सरकारला लढावे लागणार आहे.
भारतासह राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. तीन महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचे दिसलेय. ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात फक्त 160 मिमीच्या जवळपास पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट 2023 हे मान्सून वर्ष 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. १ जूनपासून संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्टअखेरपर्यंत देशातील पावसाची तूट 9 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम अर्थातच वेगवेगळ्या अंगाने होणार आहे.
आज घडीला पावसाच्या खंडामुळे खरिपाचे पीक हातचे गेले आहे. आता उद्या कदाचित पाऊस झाला तरी पिकांच्या वाढीच्या काळात जो ताण बसलेला आहे, त्यामुळे पिकांचे उत्पादन होणार नाही स्पष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेले आहे. पाऊस झालाच तर किमान रब्बीवर तरी थोडीफार भिस्त ठेवता येईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल, मात्र इतर आघाड्यांचे काय ? सिंचन प्रकप्लानमधला पाणीसाठा झपाट्याने संपत आहे. ज्या काळात रोज पाणीसाठा किती वाढला हे पाहायचे असते, त्या काळात पाणीसाठा किती राहिला हे पाहावे लागत आहे.मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात हेच चित्र आहे. त्यामुळे सहारे आणि गावांना देखील पाणीपुरवठा कसा करायचा हा प्रश्न येत्या काही दिवसात उद्भवणार आहे. शासन निधी देईलही, टँकरद्वारे पाणी पुरवू असे सांगेल , मात्र टँकर भरायचे कोठून ? यापूर्वी महाराष्ट्रात लातूर शहराला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, मात्र ज्या भागात रेल्वेचे जाळेच नाही तेथे काय करणार ?
या सर्वांच्या पलीकडे जाऊन, दुष्काळात केवळ शेतीचे नुकसान होते असे नाही, तर माणसे मोडून पडतात , त्या माणसांना उभे करण्याचे काय ?: शेतीतच काही नसेल आणि शेतकर्त्यांकडेच काही नसेल तर शेतकमजुरांचे काय ? साखर कारखानदारी धोक्यात आली तर होणाऱ्या परिणामांचे काय ? शेती आधारित उद्योगांमधून निर्माण होणार रोजगार देखील धोक्यात येणार आहे , त्या सर्वांची व्यवस्था कशी करायची ? अशा अनेक बाबाईंवर आता सरकारला विचार करावा लागणार आहे .