Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - पुरोगामित्वाचा निर्भीड चेहरा

प्रजापत्र | Thursday, 10/08/2023
बातमी शेअर करा

वैचारिक लढाई करायची असेल तर प्रसंगी सत्तेला विरोध करण्याची तयारी ठेवावी लागते आणि सत्य शोधनाच्या कामात कोण दुखावले जाते याची तमा देखील बाळगायची नसते हे ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिले असे दृष्टे विचारवंत हरी नरके होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मतितार्थ सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.

 

महाराष्ट्राला विचारवंतांची मोठी परंपरा आहे आणि वेगवेगळ्या कालखंडात महाराष्ट्राची वैचारिक मशागत करण्याचे काम अनेकांनी केले आहे. वैचारिक मशागगत करताना प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागते आणि भूमिकेतले ठामपणे तुम्हाला सत्तेच्या नजरेत अप्रिय ठरवू शकते याचे भान असतानाही ठामपणे वैचारिक भूमिका घेण्याचे काम महाराष्ट्रातील ज्या अनेकांनी केले, त्यांच्या मांदियाळीतील एक प्रमुख नाव म्हणून हरी नरके यांच्याकडे पहिले जायचे. महात्मा फुले यांच्या विचारांचा वैचारिक वारसदार असलेल्या हरी नरके यांनी पुरोगामी विचारधारा सामन्यांमध्ये रुजविण्याचे आणि बहुजन समाजाला त्यांच्यातील अस्तित्वाची , अस्मितेची जाणीव करून देतानाच कसोटीच्या क्षणी मार्ग दाखविण्याचे देखील काम केले.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम राहिलं. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांचं विशेष राहिलं. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले होते. अभिजात मराठी, आरक्षण, ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण, शिक्षण, समाजशोध आदी विविध विषयांवरही हरी नरके यांनी विपुल लेखन केले आणि या माध्यमातून समाजाला एक दिशा देण्याचे काम केले.

समता परिषदेच्या माध्यमातून जेव्हा छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या प्रश्नावर लढा सुरु केला, त्यावेळी समता परिषदेला वैचारिक अधिष्ठान देण्याचे काम हरी नरके यांनी केले. समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात विविध कार्यशाळांमधून त्यांनी ओबीसी आरक्षण, ओबीसीं समोरचे प्रश्न आणि इतर विषयांची सामान्यांना समजेल या भाषेत केलेली उकल काही पिढ्यांसाठी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता ठामपणे वैचारिक भूमिका घेण्यात आणि ती परखडपणे मांडण्यात हरी नरके यांचा हातखंडा होता. बहुजन चेतना जागवितानाच सामाजिक समतोल राखण्याचे काम त्यांनी केले. वैचारिक पातळीवर कोणत्याही चर्चेला ते कायम तयार असायचे. आंबेडकरी विचारधारा आणि फुलेंची विचारधारा यातली साम्यस्थळे किती मोठी आहेत हे मांडण्याचे काम देखील त्यांनी प्रभावीपणे केले. म्हणूनच आजच्या पिढीसाठी हरी नरके एक दिशादर्शक म्हणून परिचित होते. त्यांच्या जाण्याने पुरोगामी विचारधारेचा एक निर्भीड चेहरा समाजाने गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली . 

Advertisement

Advertisement