परळी वैजनाथ - हरी – हरी ऐक्य क्षेत्र असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र परळी आषाढी एकादशी निमित्ताने गजबजली होती. वैद्यनाथ मंदिरासह शहरातील विविध विठ्ठल मंदिरे भाविकांनी गजबजून गेली. दर्शनासाठी भाविकांनी विविध मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला वारी न घडलेले भाविक मोठ्या भक्ती भावाने परळीची वारी करतात. परळीच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक सकाळपासूनच परळीत दाखल होत होते. पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी होती.
मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. भाविकांनी रांगा लावून प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. आषाढी एकादशी निमित्ताने शहरातील विविध विठ्ठल मंदिरे गजबजली होती. जुन्या गाव भागातील धरणीधरवाड्यातील विठ्ठल मंदिर, जाजुवाडी विठ्ठल मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर, संत सोपानकाका महाराज मंदिर, संत सावता महाराज मंदिर,देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आदी विविध मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील विविध मंदिरे सजविण्यात आली होती तसेच विठ्ठल रुक्मिणी मुर्तींना पारंपरिक वेशभूषा व आरास घालण्यात आली होती.
– मेरुप्रदिक्षणेला महत्त्व
परळीत विविध धार्मिक परंपरा पहावयास मिळतात.या मध्ये परळी व पंचक्रोशीतील भाविक वैद्यनाथ दर्शन झाल्यानंतर मेरुगिरी प्रदक्षिणा करतात. मेरुप्रदक्षिणा करून जगमित्रनागा समाधीदर्शन करण्याची परंपरा येथे पहावयास मिळते. आषाढी एकादशी निमित्ताने परळी तालुक्यातील विविध गावामधून भाविकांनी पायी दिंडी ने येउन दर्शनाचा लाभ घेतला.हलकासा पाऊस सुरू असताना ही या सर्व भाविकांनी मेरुप्रदक्षिणा करून आपली वारी पूर्ण केली.