राजकीय,सार्वजनिक जीवनातली व्यक्ती मग ती कोणीही असो,ती व्यक्ती कोणत्या एका कुटुंबापुरती राहत नसते आणि म्हणूनच अशा व्यक्तीच असणं किंवा नसणं एकूणच समाज जीवनावर परिणाम करणार ठरतं.आज अजित पवारांच्या अकाली जाण्याने असाच राजकारण,समाजकारणावर मोठा आघात झालेला आहे.केवळ पवार कुटुंबाची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्हे तर एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाची घडी अजित पवारांच्या जाण्याने विस्कटली आहे.
अजित पवारानंतर काय हा प्रश्न देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला पाडण्याचे तसे काहीच कारण नव्हते,कारण एक उमदा राजकारणी म्हणून सारा महाराष्ट्र अजित पवारांकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून होता.भाजपसोबत सत्तेत जाणे ही राजकीय अपरिहार्यता असली तरी भाजपसोबत जाऊनही 'फुले शाहू आंबेडकरांचा,यशवंतराव चव्हाणांचा विचार आपण सोडणार नाही' असे ठामपणे सांगणारा आणि अल्पसंख्यांक समुदायाला विश्वास देणारा राजकारणी म्हणून अजित पवारांकडे पाहिले जायचे.अजित पवारांच्याच भरोशावर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील अनेकांनी आपली राजकीय,सामाजिक गणिते मांडलेली होती, आपले डाव मांडलेले होते.त्यामुळे नियती अजित पवारांनाच आपल्यातून हिरवण्याचा डाव साधेल असे कोणालाच,कधीच स्वप्नातही वाटणे शक्य नव्हते.मात्र जे कधी स्वप्नातही कल्पिलेले नसते ते अकल्पित वास्तव स्वीकारणे भाग पडते तसे अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राला झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक परिघात अजित पवारांचे स्वतःचे असे एक वेगळेपण आणि स्वतःचे असे एक वेगळे स्थान होते.किमान मागची दोन दशके तरी महाराष्ट्राचे राजकारण अजित पवारांभोवती फिरत आलेले आहे.अजित पवारांना वगळून महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होणारच नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात होती.महाराष्ट्राचे राजकारण दीर्घकाळ शरद पवारांभोवती फिरत आले होते,नंतरच्या काळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याभोवती राजकारण फिरत राहिले,त्यांचीही अकाली एक्झिट झाली आणि देवेंद्र फडणवीस,अजित पवार,एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनत गेले आणि त्यामुळेच अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक जीवनातील कित्येकांचे आधार होते.आज त्या सर्वांसमोर पुढे काय? हा फार मोठा प्रश्न असणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज जरी अजित पवार भाजपसोबत सत्तेत होते,तरी भाजपलाही अजित पवारांचा नाही म्हटले तरी धाक वाटायचं.अजित पवारांसारख्या नेता राज्याच्या सत्तेत असल्याने भाजपला अल्पसंख्यांकांच्या विरोधात निरंकुश भूमिका घेता येणार नाही हा विश्वास या राज्यातल्या अल्पसंख्यांक समुदायाला होता.महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाची आशा म्हणून अजित पवारांकडे,ते भाजपसोबत गेले असले तरी पाहिले जायचे आणि म्हणूनच अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अंकुश हाती घेऊन बसलेला माहूत झाले होते.किमान अनेकांच्या मनात त्यांची तशी प्रतिमा होती.बाकी कामाचा माणूस,विकासाला गती देणारा माणूस ,स्पष्टवक्ता,आर्थिक नियोजन करणारा असे प्रत्येकाला भावलेले अजित पवार वेगळे होतेच,मात्र महाराष्ट्रातला सत्ता समतोल कायम राहिलं हे पाहण्याची जबाबदारी अजित पवार निभावत अशी अपेक्षा प्रत्येकाला होती.अजित पवार आणि शरद पवारांचे पक्ष एकत्र होतील आणि आज ना उद्या महाराष्ट्रात भाजपला पर्याय म्हणून म्हणा किंवा भाजपला प्रभावी विरोध कोण करू शकेल त्या भूमिकेत म्हणा राजकीय निरीक्षक अजित पवारांकडे पाहत होते.महाराष्ट्रात भविष्यात राजकारणातील एकाधिकारशाहीला आव्हान देण्याची वेळ आलीच तर ते आव्हान अजित पवारच देऊ शकतील असा विश्वास राज्यातील अनेकांच्या मनात होता. आज तो विश्वास संपला आहे.
अजित पवारांच्या जाण्याचे दुःख आहेच.त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झालेली आहेच. या दुःखातून महाराष्ट्र आज ना उद्या सावरेल,पवार कुटुंब सावरेल,पण अजित पवारांच्या नसण्याने त्यांच्या पक्षाची घडी जशी विस्कटली आहे,तशीच एकूणच राज्याच्या राजकारण,समाजकारणाची घडी विस्कटली आहे.अजित पवारच सोबत नसतील तर पुढे करायचे काय आणि कोणत्या वाटेने जायचे हा प्रश्न आजच महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर आहे. त्यांच्या ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये आहे.अजित पवारांच्या जाण्याने राज्याची घडी विस्कटलेली आहे,ती कशी बसणार आणि कोण बसविणार ?

बातमी शेअर करा
