माजलगाव दि.२८ (प्रतिनिधी)-आरक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला पद द्यावे लागले तरी त्याला काम करू द्यायचे नाही आणि त्यासाठी 'रजेवर' पाठवायचे या राजकीय विकृतीला अजित पवारांनी माजलगावात जाहीर सभेतून खडसावले होते आणि सहाल चाऊस यांची जाहीर सभेत कानउघाडणी केली होती.आज या घटनेला भरपूर वर्ष उलटून गेली,मात्र राजकीय विकृतीबद्दल बोलणारे अजित पवार माजलगावकरांच्या कायम स्मरणात राहतील.
माजलगाव नगरपालिकेत नानाभाऊ शिंदे यांच्याकडे अध्यक्षपद होते.अध्यक्षपद राखीव असल्याने त्यांच्याकडे हे पद देण्यात आले.त्यावेळी सहाल चाऊस हे उपाध्यक्ष होते.त्याच काळात माजलगाव शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती,तसेच इतर काही विकासकामे होणार होती.त्यासाठी अजित पवार माजलगाव शहरात आले होते.आता इतक्या मोठ्या कामांचे श्रेय इतर कोणाला तरी जाऊ द्यायचे नाही म्हणून नानाभाऊ शिंदे यांना रजेवर पाठविण्यात आले आणि सहाल चाऊस यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार आला.पण कार्यक्रमाच्या मंचावर मात्र रजेवर गेलेले नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे आणि प्रभारी नगराध्यक्ष सहाल चाऊस एकत्रित उपस्थित होते.त्यावेळी माजलगावच्या मोंढा मैदानावर झालेल्या सभेत अजित पवारांनी जाहीरपणे या 'रजे'च्या राजकीय विकृतीवरून चाऊस आणि एकूणच राजकारण्यांना चांगलेच खडसावले होते.'रजेवरचे आणि प्रभारी एकत्र कार्यक्रमाला असतात,हे मी केवळ तुमच्याकडेच पाहत आहे' असे आपल्या खास शैलीत बोलून अजित पवारांनी याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली होती.आपल्याच पक्षातील चुकीच्या गोष्टींबद्दल जाहीरपणे बोलणारे अजित पवार आजही माजलगावच्या अनेकांच्या लक्षात आहेत.

प्रजापत्र | Thursday, 29/01/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
