बीड दि.२८ (प्रतिनिधी)-बीड जिल्हा हा पवारांना मानणारा जिल्हा असला तरी हा दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा,त्यामुळे साहजिकच या जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष असायचे आणि गोपीनाथ मुंडे राज्यात काही करणार असतील तर बारामतीकर पवार मुंडेंच्या बीड जिल्ह्यात राजकीय चाली खेळायचे.महाराष्ट्रात हे पवार- मुंडेंचे कलगीतुऱ्याचे राजकारण कायम चर्चेचा विषय असायचा.दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार आणि अजित पवारांनी तरुण चेहऱ्यांना सोबत घेऊन काहीवेळा राजकीय समीकरणे बदलली होती.
बीड जिल्हा परिषद म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा आत्मा.मुंडेंसाठी प्रतिष्ठा.इथे गोपीनाथ मुंडे कायम 'जादूची कांडी' चालवायचे.म्हणजे भाजपचे सदस्य कमी निवडून आले तरी विरोधकांमधील असंतुष्टांना सोबत घेऊन ते जिल्हापरिषदेवरची सत्ता मात्र टिकवायचे.मात्र एकदा अजित पवारांनी स्वतः जिल्हापरिषदेत लक्ष घालून गोपीनाथ मुंडेंच्या ताब्यातील जिल्हापरिषद काढून घेतली होती.त्यावेळी आ.सुरेश धस यांच्या माध्यमातून आणि अशोक डक,दिलीप गोरे या तरुण चेहऱ्यांना सोबत घेऊन अजित पवारांनी बीडच्या जिल्हापरिषदेचे सारीच समीकरणे पलटवून टाकली होती.पुढे आ.सुरेश धस यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यातील भाजपच्या झोळीत टाकली हा भाग वेगळा.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघात अमरसिंह पंडितांचा भाजपच्या तिकिटावर पराभव झाला होता. त्या पराभवाला भाजपमधीलच एक गट कारणीभूत असल्याची पंडित कुटुंबाची धारणा होती,त्या धारणेला खतपाणी घालत आणि विकासाच्या प्रक्रियेत येण्यासाठी गोंजारत अमरसिंह पंडितांना पर्यायाने पंडित कुटुंबाला पुन्हा स्वगृही अर्थात राष्ट्रवादीत घेण्यात अजित पवार यशस्वी झाले होते.अमरसिंह पंडित राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात अजित पवारांनी बंधाऱ्यांच्या कामांसाठी निधी देखील भरपूर दिला होता.
२०१२ मध्ये थेट गोपीनाथ मुंडे यांच्याच कुटुंबात फूट पडली.धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले.त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय जरी शरद पवारांचा असला तरी राष्ट्रवादीत त्यांचे हित पाहिले जाईल असा विश्वास देण्याचे काम अजित पवारांनी केले होते.किंबहुना या प्रवेश अगोदर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंना कमी पडणारी मते जुळवून देण्यात देखील अजित पवारांची भूमिका महत्वाची राहिलेली होती.२०१२ मध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले आणि त्यानंतर कायम अजित पवारांसाठी सक्रिय राहिले.अजित पवारांच्या कोणत्याही भूमिकेत,इतरांच्या राग लोभाची पर्वा न करता धनंजय मुंडे अजित पवारांची कुमक करत आले होते.म्हणूनच आज अजित पवारांच्या अकाली जाण्याने धनंजय मुंडे काय किंवा विजयसिंह पंडित काय यांना अश्रू अनावर होणे साहजिकच होते.
बीड जिल्ह्यातील तरुण चेहरे म्हणून कधी रमेश आडसकर असतील,आज खासदार असलेले बजरंग सोनवणे असतील,राजकिशोर मोदी,दिलीप गोरे आदींवर अजित पवारांनी कायम प्रेम केले.अजित पवारांच्या राजकीय गणितांमधील 'हातचे' म्हणून असे अनेक चेहरे आज मात्र अजित पवारांच्या अकाली जाण्याने हतबल झाले आहेत.

प्रजापत्र | Thursday, 29/01/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
