Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - आव्हाने पेलण्याचे आव्हान

प्रजापत्र | Monday, 19/06/2023
बातमी शेअर करा

शिवसेना हे नाव भलेही आज एकनाथ शिंदेंकडे असेल, उद्या त्याचे काय होईल माहित नाही, मात्र ठाकरे वगळून शिवसेना हे समीकरण महाराष्ट्र स्वीकारेल का हा मोठा प्रश्न आहे, आणि आजपर्यंतच्या अनुभवांवरून त्याचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने भलेही शिवसेना नाव घेतले असेल, मात्र त्यांची ओळख शिंदे सेनाच राहील. या उलट आज जरी उद्धव ठाकरेंसमोर अनेक आव्हाने दिसत असली तरी महाराष्ट्रातील कडवा शिवसैनिक हा कायम ठाकरे या नावावर प्रेम करीत आलेला आहे, आणि तीच शक्ती घेऊन पुढे चालण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंना पेलावे लागणार आहे. आज शिवसेनेच्या स्थापनेला ५७ वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे तसा महाराष्ट्रातला काँग्रेस नंतरचा सर्वात जुना पक्ष असलेल्या या पक्षाचा विचार उद्धव ठाकरे कोणत्या वळणांनी नेणार हाच प्रश्न आहे.
 

      आज शिवसेनेचा वर्धापन दिन. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, त्याला आज ५७ वर्ष पूर्ण झाली. मुंबईतील मराठी माणसासाठी म्हणून सुरु झालेली संघटना, भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना आणि नंतरच्या काळात कडव्या हिंदुत्वाचा प्रचार, प्रसार करणारी संघटना असा शिवसेनेचा प्रवास झाला, त्या प्रत्येक वळणावर बाळासाहेब ठाकरे हयात होते. या काळात शिवसेनेने अनेकदा स्वतःच्या भूमिका बदलल्या. कधी काँग्रेस सोबत तर कधी चक्क मुस्लीम लीग सोबत या पक्षाने आघाडी केल्याचा इतिहास आहे. इंदिरा गांधींवर टीका करणारी शिवसेना आणीबाणीचे समर्थन करताना राज्याने पहिली आणि भाजपसोबत युती असताना देखील राष्ट्रपती पदासाठी वेगळी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळे शिवसेनेची खरी भूमिका कोणती असे विचारले तर ती भूमिका म्हणजे 'कालाय तस्मै नमः.' या पक्षाने काळानुसार अनेक वेळा भूमिका बदलल्या, अनेक वळणे घेतली. एकेकाळी अभेद्य असणारी शिवसेना फुटू शकते हे बाळासाहेबांच्याच हयातीत छगन भुजबळ , नारायण राणे आणि खुद्द राज ठाकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आज याची आठवण काढण्याचे कारण म्हणजे शिवसेनेचा इतिहास पहिला तर अनेकदा भूमिका बदलून आणि अनेक धक्के पचवून देखील शिवसेना वाढत राहिली. कारण शिवसेना आणि शिवसैनिक हे नातेच वेगळे आहे.
     शिवसेनेच्या स्थापनेपासून सामान्य शिवसैनिकाने शिवसेनेवर प्रेम केले, किंबहुना शिवसेनेवर म्हणण्यापेक्षाही बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंवर प्रेम केलेले आहे. शिवसैनिक आणि ठाकरे हे नाते वेगळे करता येवूच शकत नाही. त्यामुळेच राज ठाकरेंना देखील शिवसेनेपासून वेगळे होऊन शिवसेनेला फार काही धक्के देता आले नव्हते. ठाकरे या नावाशी, म्हणजे बाळासाहेबांच्या कुटुंबासही सामान्य शिवससैनिकाचे असलेले नाते राजकारणापलिकडे आहे आणि हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आणि म्हणूनच आज जरी बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे कायदेशीर प्रमुख एकनाथ शिंदे असले आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उबाठा ) म्हणून वेगळे व्हावे लागले असले तरीही सामान्य शिवसैनिक आजही शिवसेना कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनाच मानतात हेच आजचे राजकीय वास्तव आहे. एकनाथ शिंदेंना शिवसेना नावावर दावा करता आला असेल, मात्र राज्यभर असलेल्या शिवसैनिकांना जोडून ठेवणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.
     गेल्या ५७ वर्षाच्या कालखंडात शिवसेनेला अनेक राजकीय वळणांवरून जावे लागले. या ५७ वर्षात शिवसेना बहुतांश वेळा विरोधीपक्षात होती, मात्र असे असले तरी या पक्षाचा एक दरारा होता, याच पक्षाने लोकशाही खऱ्याअर्थाने राजकारणात प्रस्थापित असणा-या कुटुंबांमधून काढून सामान्यांच्या घरांपर्यंत आणली. जातीय वर्चस्वाच्या राजकारणात शिवसेना कोणालाही आमदार, खासदार करू शकते हा राजकीय चमत्कार बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखविला. हाच वारसा आज उद्धव ठाकरेंकडे आहे. ठाकरेंच्या पक्षापुढे आज शिवसेना (उबाठा ) नाव असले तरी खरी शिवसेना म्हणून सामान्य शिवसैनिक आजही त्यांच्याकडेच पाहतो, आणि म्हणूनच आज इतके सारे होऊनही भाजपलाही ठाकरेंना पुन्हा गोंजारावे वाटते यातच खूप काही आले आहे. एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाली असली तरी तो कायम शिंदे गटचं राहील, शिवसैनिकांच्या प्रेमाचा वसा आणि वारसा सोबत घेऊन त्यांच्या निष्ठेची मशाल घेत राज्याच्या राजकारणात पुढे जाण्याचे आव्हान म्हणूनच उद्धव ठाकरेंना पेलावे लागणार आहे. बाकी एकनाथ शिंदे, त्यांचा गट आणि त्यांच्या शिवसेनेचे काय होणार हे काळच ठरवेल.

Advertisement

Advertisement