धारूर दि.१४(प्रतिनिधी):केज तालुक्यातील होळ येथील राशन दुकानातून टेम्पोने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला गहू पोलिसांनी पाठलाग करून धारूर शहरातील एका दुकानासमोर पकडला. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.१४) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास केली. याचा पंचनामा सुरू असून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती धारुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी दिली आहे. दरम्यान, सदरील धान्य होळ येथील राशन दुकानदार अशोक तुकाराम घुगे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली वाहनचालकाने दिली आहे.
आडस येथील चौकात उभे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आडसमधून धारूरच्या दिशेने जात असलेला छोटा टेम्पो (क्र.एम.एच. ४४ यू २२५७) दिसून आला. पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्याचा पाठलाग केला. तेव्हा धारूरमधील एका धान्याच्या दुकानासमोर टेम्पो उभा दिसून आला. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असताना चालकाने त्याचे नाव इब्राहिम खाजा (रा.धारुर) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धान्याच्या कसल्याही पावत्या आढळून आल्या नाहीत, तसेच सदरील धान्य राशनचे असल्याचा संशय आल्यावरून पंचनामा केला. यावेळी वाहन चालकाने होळ येथील राशन दुकानदार अशोक तुकाराम घुगे याच्याकडून माल घेऊन धारूरच्या मोंढ्यात विक्रीसाठी देत असल्याची कबुली पंचनाम्यात दिली. पुरवठा विभागाकडे नोंदीनुसार, अशोक घुगे याचे राशन दुकान कोलंबस सहकारी संस्था अंतर्गत होळ येथे कार्यरत आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या उपस्थितीत केलेल्या पाहणीत अंदाजे ४० ते ५० गोण्या गहू आढळून आला असून सुमारे २५ क्विंटलहून अधिक धान्य असल्याची माहिती आहे. पुढील कार्यवाहीसाठी पुरवठा विभागाला अहवाल दिला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राशन दुकानातून सर्रासपणे काळ्या बाजारात स्वस्त धान्याची विक्री करण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. याकडे जिल्हा पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, याप्रकरणात पोलिसांनी गतीने कारवाई केली असून आता पुरवठा विभागानेही कठोर कार्यवाही केल्याशिवाय राशनमाफियांना चाप बसणार नाही.