Advertisement

 राज्यभर पावसाचा जोर वाढला 

प्रजापत्र | Saturday, 26/07/2025
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. कोकणासह विदर्भ मराठवाड्यातही पावसाची झड कायम आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक धरणांमधून विसर्ग सुरू असून जलसाठ्यातही वाढ झाली आहे. विदर्भात पावसामुळे दाणादाण उडाली असून नदी नाले तुडुंब वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली असून आज बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचे अंदाज हवामान विभागाने दिले आहेत. राज्यभरात पावसाची कुठे काय परिस्थिती आहे?  

विदर्भात मुसळधार पावसाने दाणादाण
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात होणाऱ्या जोरदार पावसामुळे उतावली गावाजवळ चाकर्डा पाटियाकडे जाणारा मार्ग दोन तासांपासून बंद आहे.  भंडार्यातील आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. संततधार पावसामुळे शेतात पाणी साचायला सुरुवात झाली असून अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.वाशिम जिल्ह्यात रात्री पासून सर्वदूर पावसाची रिपरिप  सुरू असू  दुपारी 1 वाजे नंतर पावसाचा जोर वाढलाय सतत बरसत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील 3  मोठे धरण प्रकल्प  100 टक्के  तुडुंब भरले असल्याच चित्र आहे..असाच काही दिवस पाऊस बरसला तर जिल्ह्यातील इतर  धरण प्रकल्प  तुडुंब  भरण्याची शक्यता आहे..

अमरावती आणि गोंदियात पूरसदृश्य स्थिती
अमरावती शहरात रिमझिम पावसासोबतच ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील मेघा नदी दुथडी भरून वाहत असून परिसरातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. शहरातील गणेशनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असून परिसर जलमय झाला आहे. नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तिरोडा महामार्गावरील अवंती चौकात चार फूट पाणी साचले असून लोक जीवघेणा प्रवास करत आहेत. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. भंडाऱ्यातील नदीनाले ओसंडून वाहत असल्याने जिल्ह्यातील आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. साकोली, लाखनी तालुक्यातील अनेक मार्गांवर पाणी साचल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते बंद केले आहेत.

मराठवाड्यात पावसाची संततधार
हिंगोली जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असला तरी सकाळपासून रिमझिम स्वरूपाचाच पाऊस पडत आहे. मागील आठ दिवसांपासून असाच पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी दुपारपासून पावसाची संततधार असून पावसाचा जोर वाढला आहे. धाराशिव, लातूर, परभणी, बीड जिल्ह्यातही सकाळपासून पावसाच्या सरी बरसतायत. काही ठिकाणी हलका पाऊस असला तरी बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला
कोकण किनारपटटीसह मुंबई उपनगर व आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने मुंबईसह संपूर्ण कोकण विभागाला पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत. मध्य महाराष्ट्रा पुण्यासह सातारा घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघरला आज रेड अलर्ट आहे.  कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. सखल भागात पाणीच पाणी झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Advertisement

Advertisement