Advertisement

म्हाळसपिंपळगाव शिवारात वाळूमाफियांवर छापा

प्रजापत्र | Saturday, 22/04/2023
बातमी शेअर करा

गेवराई - तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथे वाळुउपसा करून ती वाळू घेवून जाणारे तीन ट्रॅक्टरसह वाळू उपसा करण्यासाठी लागणारी केनी जप्त करण्यात आली. हि कारवाई (दि.२२) रोजी झाली. गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळु उपसा होतो. गोदावरी ज्या गावाशेजारून जाते त्या-त्या गावांमध्ये छोटे-मोठे वाळुमाफे आपला उच्छाद मांडत सर्रासपणे गोदावरीपात्रात उत्खनन करतात. या कारवाईत तलाठ्याच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल विभागासह पोलीस प्रशासनाच्या साथीने गेवराई तालुक्यात वाळू उपश्याला प्रोत्साहन मिळत असल्याची ओरड सातत्याने होते. काही ठिकाणी कारवाया केल्या जातात, तर काही ठिकाणी जाणिवपुर्वक वाळूमाफियांकडे दुर्लक्ष केले जाते. तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला झाल्यानंतर त्याठिकाणी छापा मारून तीन ट्रॅक्टरसह एक केनी जप्त करून खामगाव सज्जाचे तलाठी किरण लांडगे यांच्या फिर्यादीवरून सुभाष डाके, बप्पासाहेब खंडागळे, भागवत डाके, नाना पठाडे, किरण पठाडे यांच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement