Advertisement

पाणी पुरवठा विभागाच्या नाकर्तेपणामुळे परत गेला सहा कोटीचा निधी

प्रजापत्र | Wednesday, 02/12/2020
बातमी शेअर करा

बीड: : एकीकडे कोरेानाच्या पार्श्‍वभूमीवर विकास कामासाठी निधी मिळणे अवघड झाले असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला मिळालेला निधी खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याला पाणी पुरवठा योजनांसाठी मिळालेला तब्बल 6 कोटीचा निधी वेळेत खर्च न झाल्याने परत गेला आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेतून 86 तर मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 17 योजना सुरु आहेत. त्याशिवाय पाणी पुरवठा योजनांच्या किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. या कामांसाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती. मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला हा निधी वेळेत खर्च करता आला नाही. त्यामुळे तब्बल 6 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शासनाला परत केला आहे. बीड जिल्ह्यात अजूनही निम्म्याहून अधिक गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सोय नाही असे असताना योजनांसाठी मिळालेला निधी खर्च होत नसल्याचे चित्र खेदजनक आहे. 

अमिषापोटी होत नाही खर्च
मिळालेल्या माहितीनूसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागात गुत्तेदारांनी अधिकार्‍याचंी भेट घेवून त्यांना ‘समाधानी’ केल्याशिवाय संचिका पूढे हालत नाहीत. त्यातही मागच्या काही काळात या विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या ‘अपेक्षा’ वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यात कंत्राटदार कमी पडत असल्याने कामे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आलेला निधी खर्च न होता परत जात आहे. 

 

हेही वाचा 

Advertisement

Advertisement