आज रामराज्य आणण्याचे संकल्प जे लोक बोलून दाखवित आहेत, त्यांचे पूर्वासुरी असलेला संघ परिवार ज्यावेळी फारसा दखलपात्र देखील नव्हता किंवा ज्यावेळी अगदी जनसंघाचेही अस्तित्व देखील नव्हते, त्यावेळी महात्मा गांधींनी भारतात 'रामराज्य' ही संकल्पना मांडली होती. अर्थात महात्मा गांधींच्या संकल्पनेतील रामराज्य हे एका धर्माचे राज्य नक्कीच नव्हते, तर खुद्द तुलसीदास यांनी सांगितलेली दैहिक, दैविक, भौतिक तापा। राम राज नहिं काहुहि ब्यापा।। सब नर करहि परस्पर प्रीती । चलही स्वधर्म निरत श्रुति निती ।।यास्वरुपाची होती. त्यामुळे आज रामाच्या नावाने राजकारण करून दोन समाजांना समोरासमोर उभे करण्याचे जे सत्ताकारण सुरु आहे, ते राजकारण आहे, ते रामकारण नक्कीच नाही. अशाने रामराज्य कसे येईल ?
आज राम नवमी, आपण रामाला इतिहासपुरुष म्हणू अथवा पुराणपुरुष, पण राम भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. ते आज नाही, तर अनादी काळापासून आहे. राम या व्यक्तिरेखे भोवती सत्य, वचनप्रिय, प्रजावत्सल, आणि अगदी मर्यादापुरुषोत्तम अशा गुणांचा समुच्चय जो लागलेला आहे, या सद्गुणांचे आकर्षण कोणत्याही समाजव्यवस्थेला आणि समाजसमुहाला असतेच असते. हे गुण आत्मसात करणे अवघड असले तरी या गुणांमुळेच व्यक्तीला देवत्व येते इतकी जाणीव प्रत्येक कालखंडातील समाजमनाला होती व आहे, आणि म्हणूनच राम काय किंवा रामराज्य काय, हे जनसामान्यांना भावणारे राहिलेले आहेत. अर्थात हे रामराज्य आजचे राज्यकर्ते सांगत आहेत त्या धर्तीवरचे रामराज्य नक्कीच नाही. मुळात रामराज्य ही संकल्पना आज दाखविली जाते तशी भाजपची, त्यांचे पूर्वासुरी असलेल्या जनसंघाची किंवा अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वतःची आहे असेही नाही. ज्यावेळी संघ परिवार देशात फारसा दखलपात्र नव्हता त्यावेळी म्हणजे १९२९ मध्ये महात्मा गांधींनी रामराज्याची संकल्पना मांडली होती. आणि ही संकल्पना मांडताना त्यांनी रामराज्य म्हणून त्यांना काय अपेक्षित आहे हे देखील सांगितले होते. दि.१९ सप्टेंबर१९२९ च्या 'यंग इंडिया' मध्ये महात्मा गांधी लिहितात, 'मी रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असा समजत नाही. रामराज्य हे देवाचे राज्य आहे, असे मी मानतो. माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोन्हीही एक आणि सारखेच आहेत. सत्य आणि सद्गुणांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नाही. माझ्या कल्पनेतील राम या पृथ्वीतलावर खरोखरच होऊन गेला का, हे मला माहिती नाही. परंतु, रामायण हे खऱ्या लोकशाहीचे असे उदाहरण आहे, जिथे लांबलचक आणि महागड्या प्रक्रियांना सामोरे न जातासुद्धा समाजातील शेवटच्या नागरिकाला न्याय मिळू शकतो. असे रामराज्य त्यावेळीही महात्मा गांधींना अपेक्षित होते. दांडी यात्रेदरम्यान महात्मा गांधींनी आपली रामराज्याची संकल्पना अधिक विस्तारित करीत सांगितले की 'मी रामराज्य म्हणतो, म्हणजेच नागरिकांच्या नैतिकतेवर आधारलेले राज्य. धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य' अशी मांडणी गांधींनी केली. आणि अगदी देशाचे स्वातंत्र्य समोर दिसत असतानाच्या काळात आता आपण स्वतंत्र झालो म्हणजे लगेच रामराज्य अवतरेल असला स्वप्नाळूपणा जे कोणी पळून होते त्यांच्यासाठी महात्मा गांधींनी १ जून १९४७ रोजी गांधीजींनी 'हरिजन' मध्ये लिहिले, 'ऐश्वर्यात लोळणारे काही लोक आणि पुरेसे अन्नही न मिळणारे सामान्य नागरिक अशा अन्यायकारक असमानतेच्या काळात रामराज्य अस्तित्वात येणे शक्य नाही'.
अर्थात महात्मा गांधी हा जो रामराज्याचा विचार मांडीत होते, त्यामागे त्यांच्यातला तत्वचिंतक तर होताच, पण महात्मा गांधी केवळ तत्वचिंतक नव्हते तर ते धर्माचे अभ्यासक देखील होते. धर्माची मांडणी मानवतेच्या अंगाने करणारे दृष्टे विचारवंत होते. आणि त्या मांडणीला धर्मशास्त्राचा आधार ते देत होते. म्हणूनच महात्मा गांधींनी वरीलप्रमाणे जी काही मांडणी केली होती, त्याला आधार अर्थातच रामचरितमानसकार तुलसीदास आणि संत कबीर यांच्या दोह्यांचा होता. रामराज्य म्हणजे दैहिक , दैविक, आणि भौतिक पापांपासून मुक्त अशी, सर्व लोक परस्परांवर प्रेम करतात आणि स्वतःच्या धर्माचे, नीतीचे पालन करतात अशी व्यवस्था असे तुलसीदासांनीच लिहून ठेवले आहे.
एकीकडे रामराज्याची संकल्पना इतकी व्यापक असताना आजचे वास्तव काय आहे? नैतिक राजकारणाचे आदर्श स्वरूप म्हणून भारतीय संस्कृती रामाकडे पाहते, रामांच्या आयुष्यावर नजर टाकली तर त्यांनी कधी एकाच एक संस्कृतीचा अट्टाहास केला असेही नाही. अयोध्या, त्यानंतरचा वनवास आणि लंका युद्ध, या सर्व ठिकाणी बहुविध संस्कृतीची सरमिसळ रामाच्या आयुष्यात आहे. आज राजकारणात नैतिकता उरली आहे का? आणि संपूर्ण देशावर एकाच एक संस्कृती लादण्याचा जो अट्टाहास सुरु आहे, ते सारे देशाला रामराज्याकडे कसे नेणार आहे? जो राम राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या मताचा आदर करण्याचे, आणि त्यानुसार निर्णय घेण्याचे सांगतो, त्या रामाचे भक्त म्हणवणारे लोक जर सत्तेत आल्यावर जनतेच्या मताचा आदर करणे तर दूर, सत्ताविरोधी विचारलाच देशद्रोही ठरविणार असतील, सत्ताधाऱ्यांच्या विरोधी विचार मांडले म्हणून जर अगदी देशाच्या निवृत्त न्यायाधीशांवर टिका होणार असेल तर रामराज्य कसे येईल? रामराज्याचा संकल्पनेत प्रजावत्सलता होती, कोणी उपाशी राहू नये हे धोरण होते, महात्मा गांधींनी देखील रामराज्य संकल्पना मांडताना भांडवलशाहीला सरसकट विरोध केला नाही, त्यांनी विश्वस्ताच्या भूमिकेतील भांडववलशाही, समाजवादी व्यवस्था सुचविली. आज मात्र अशी विश्वस्ताची भावना औद्योगिक घराण्यांमध्ये नाही आणि सत्तेच्या चाव्या हातात आल्यानंतर राज्यकर्ते आपल्या मित्रांसाठी 'राष्ट्र सर्वोपरी' ला देखील तिलांजली देणार असतील तर 'आप पर भाव' रहित व्यवस्थेची संकल्पना असणारे रामराज्य कसे येईल? आज रामनवमीच्या निमित्ताने राम चरित्रातील हा व्यापक विचार अंगिकारणे राहिले किमान अभ्यासण्याची तरी मानसिकता समाज आणि भक्त मंडळी दाखविणार आहेत का?