Advertisement

हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांनी दिलं उत्तर

प्रजापत्र | Wednesday, 08/03/2023
बातमी शेअर करा

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत एक व्यक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. पण, नोटिशीची मुदत संपूनही राऊतांनी उत्तर दाखल केलं नव्हतं. आज ( ८ मार्च ) संजय राऊतांनी नोटिशीला उत्तर दिलं आहे. आपण केलेल्या वक्तव्याबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

 

 

संजय राऊत पत्रात काय म्हणाले?

मा. प्रधान सचिव,

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

 

कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधानमंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला ३ मार्च २०२३ पर्यंत सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मुदत दिली.

१)  मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दि. ४ मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी.

२) महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे.

मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे.

 

तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी.

 

आपला नम्र,
(संजय राऊत)

 

 

काय म्हणाले होते संजय राऊत?
कोल्हापूर दौऱ्यात असताना संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख ‘चोर’मंडळ असा केला होता. “महाराष्ट्रातील विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे,” असा उल्लेख करत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपावर टीकास्र डागलं होतं. या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होतं राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती.

Advertisement

Advertisement