माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी आहे. आम्ही मविआ म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपाचा उमेदवार कसबा पेठेत सातत्याने निवडून येत होता. आधी गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांनी हा मतदारसंघ राखला होता. यावेळी भाजपाच्या विरोधात रवींद्र धंगेकर हा अत्यंत योग्य उमेदवार आम्ही दिला होता. तिथेच आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी अनेक वर्षे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो. रवींद्र हे काँग्रेसमध्ये चांगलं काम करत होते. योग्य उमेदवार दिले तर मविआ राज्याच्या राजकारणातही निवडणून येऊ असाही विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन आणि सत्याग्रह केला होता. इथल्या मतदारांनीही सांगितलं की कोण आलं होतं काय करत होते? हे सांगितलं आहे. भाजपाकडे असलेली ही जागा महाविकास आघाडीने खेचून आणली आहे. चिंचवडलाही हे घडलं असतं पण तिथे काही लोकांना तिकिटं हवी होती. राहुल कलाटेलाही मी थांबायला सांगितलं होतं. त्याचा फॉर्म निघू नये म्हणूनही प्रयत्न झाले. राज्यकर्त्यांनी कसबा असेल किंवा चिंचवड असेल दोन्हीकडे सगळे प्रयत्न पणाला लावले. पण पुण्यात त्यांना यश आलं नाही. दोन्ही जागा भाजपाच्या होत्या. चिंचवडमध्ये सहानुभूतीचा मुद्दा होता. तसंच शिवसेनेचं जे चिन्ह आणि पक्ष काढून घेतलं त्यामुळे मतदार चांगलेच चिडले होते. शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये ही चिड आम्हाला पाहण्यास मिळाली असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.