शितल वाघमारे
धाराशिव : जिल्ह्यातील वाशी व भूम तालुक्यात पवन चक्की ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात कामाची अडवणूक करणे, खंडणी, मारहाण करणे, विजेचा पुरवठ्यात अडथळे निर्माण करणे, साहित्य चोरणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.अशा व्यक्तींविरुद्ध पोलिस स्टेशन अथवा पोलीस अधीक्षक कार्यलयाकडे थेट तक्रार करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
धाराशिव जिल्हा हा देशात आकांक्षित जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार पवन व सौर ऊर्जा वर आधारित प्रकल्प मोठ्या प्रमाणावर येत आहेत. जागतिक कंपन्या जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास तयार असून त्यातून जिल्ह्याची वेगळी ओळख तयार होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांना मोबदला मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नापीक जमिन असून अशा जमिनीचा वापर पवन व सौर ऊर्जा प्रकल्पा साठी होत असून त्याचा आर्थिक फायदा या भागातील शेतकऱ्यांना होत आहे.
जिल्ह्याचा बराचसा भाग हा डोंगराळ आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षापासून पवनचक्की उभ्या राहत आहेत. प्रथम भूम तालुक्यामध्ये काही पवनचक्क्या उभ्या राहिल्या. यातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मित होऊ लागली. तसेच शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळू लागला. मागील काही वर्षात लोहारा-उमरगा तालुक्यात 90,उस्मानाबाद-तुळजापूर तालुक्यात 38 पवन चक्क्यांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या वाशी व भूम तालुक्यांमध्ये विविध कंपन्यांच्या माध्यमातून 90 पवनचक्क्यांचे काम प्रगती पथावर आहे.
या पवन व सौर ऊर्जा कंपन्या जिल्ह्यात प्रकल्प उभारणीसाठीआल्यानंतर त्यांना स्थानिक गावगुंडा कडून मोठ्या प्रमाणात अडवणूक करून खंडणी मागितली जात आहे. मागील आठ दिवसांपूर्वी वाशी तालुक्यातील अज्ञात व्यक्तींनी रात्री कंपनीच्या प्रकल्पावर जाऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच भूम पोलिस स्टेशनमध्ये 29 जानेवारी 2023 रोजी सहा अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 452, 143, 147, 148, 149,427, 506 या कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दिलेल्या तक्रारीत दुधोडी शिवार प्रकल्पातील सतरा वाहनांची तोडफोड, ऑफिसच्या खिडक्यावर फोडणे, तेथील कर्मचाऱ्यांना लोखंडी गजाने मारहाण करून 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.या प्रकरणी तपास सुरू असून अद्याप आरोपी सापडले नाहीत.
तसेच भूम शहर व तालुक्यामध्ये या कंपन्यांचे कर्मचारी राहत आहेत. त्यांच्या निवासस्थानी मारहाण करणे, अडवणूक करणे, शिवीगाळ करणे, कामे न करू देणे, दमदाटी करून पैसे घेणे, साईट वरील साहित्याची चोरी करणे, कंपन्यांचे येणारे साहित्य अडवुन ठेवणे,विद्युत प्रवाह मार्गात अडथळे निर्माण करणे, असे प्रकार मागील तीन महिन्यापासून घडत आहे. वाशी व भूम तालुक्यामध्ये चोरी व मारहाणीचे गुन्हे नोंद झालेले आहेत.
कंपनीचे चालू असलेले काम बंद पाडून दादागिरी केली जात आहे. असे प्रकार करणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याची चर्चा नागरिक दबक्या आवाजात करीत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचे काम काही मंडळी करीत आहे.
पालकमंत्री लक्ष देणार का ?
परंडा भूम वाशी तालुका हा राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील आहे. यांच्याच मतदारसंघांमध्ये या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. या प्रकरणी मंत्री सावंत लक्ष देतील का ?
जिल्ह्यात अशा प्रकारचे काही गुन्हे नोंद झालेले आहेत याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. नागरिकांनी कोणालाही न घाबरता जवळील पोलीस स्टेशनमध्ये अथवा पोलीस अधीक्षक कार्यालयात थेट तक्रार करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.