निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा निर्णय झाला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. अशात सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच पक्षाचं नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणजे शिवसेना संपली असं कुणीही समजू नये. ज्यांनी आधी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पाहते आहे मात्र चोर तो चोरच असतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर आज मातोश्रीबाहेर उभं राहूनही त्यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे.
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?
“आज महाशिवरात्र आहे, मात्र आपलं शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. या चोरांना आम्ही धडा शिकवणार आहोत. आपण सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू. मी या चोरांना आव्हान देतो आहे की, तुम्ही जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू जनता कुणाला निवडणार?” असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटाला दिलं आहे.
२०२२ मध्ये सेनेत सर्वात मोठी फूट
शिवसेनेत जून २०२२ मध्ये सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह आधी सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. २१ जून ते २९ जून हे नाट्य सुरू होतं. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला. सरकार अल्पमतात आलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असेलेले उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.