बारावी इयत्तेत शिकत असलेल्या 18 वर्षीय मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली. घरी अभ्यास करताना माेबाईलवर टाईमपास करणाऱ्या मुलाला आईने टोकले आणि राग अनावर झालेल्या मुलाने थेट आईला भिंतीवर ढकलून देत त्यानंतर तिचा गळा दाबून निर्घृण खून केला. आई निपचित पडल्याचे पाहून घाबरलेल्या मुलाने आईने गळफास घेतल्याचा बनाव करत तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. परंतु पाेलिसांच्या तपासात आणि शवविच्छेदन अहवालात आत्महत्येचा बनाव उघडकीस आल्याची माहिती पाेलिसांनी शुक्रवारी दिली. तसलीम जमीर शेख (वय-37,रा.उरळीकांचन,पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा जिशान जमीर शेख (वय 18) यास लाेणीकाळभाेर पाेलिसांनी अटक केले आहे. त्याच्या विराेधात पाेलिस उपनिरीक्षक अमाेल घाेडके यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पाेलिसांनी आराेपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अशी घडली घटना
15 फेब्रुवारी राेजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कुटुंबीय हे उरळीकांचन परिसरात पिराचा चाैक येथील माऊली कृपा इमारतीत पती-पत्नी, एक मुलगा व मुलगी असे एकत्रित राहतात. जमीर शेख हे एका बँकेचे कलेक्शन प्रतिनिधी म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी घरात तसलीम शेख आणि त्यांचा मुलगा जिशान हे दाेघेच हाेते. तर जमीर शेख हे नमाजासाठी घराबाहेर गेले हाेते आणि 8 वी मध्ये शिकणारी मुलगी ही शाळेत गेलेली हाेती.
असा रचला बनाव
जिशान हा 12 वी मध्ये शिकत असून ताे घरीच अभ्यास करत हाेता. मात्र, अभ्यास करताना ताे माेबाईल सातत्याने पाहत असल्याने त्याच्या आईने त्याला माेबाईल पाहूू नकाे असे सांगत रागावून माेबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिशान हा आईला उलट बाेलल्याने तिने त्याच्या गालावर चापट मारली. त्यामुळे जिशान याने आईला जाेरात भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे त्या खाली काेसळल्यानंतर तिने जिशान याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, मुलाने तिचा गळा दाबून धरुन तिचा जागीच खून केला. मात्र, आई निपचित पडल्याचे पाहून जिशान घाबरला आणि त्याने ब्लेडने तिच्या मनगटावर वार केला. परंतु तिचा मृत्यु झाला असल्याने त्यातून रक्त येऊ शकले नाही. त्यामुळे त्याने घरातील एक वायर फॅनला अडकवून त्याच्या खाली आईचा मृतदेह ठेवला.
शवविच्छेदन अहवालातून सत्य समाेर
काही वेळाने वडील जमीर शेख घरी आल्यावर आईने गळफास घेतल्याचे सांगत, त्याने मी तिला खाली उतरुन ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे दाेघांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु डाॅक्टरांना संशय आल्याने त्यांनी तिला ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. ससून रुग्णालयात तिला आणले असता तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समाेर आले.