Advertisement

मिलिंद साठे यांचे निधन

प्रजापत्र | Saturday, 11/02/2023
बातमी शेअर करा

आर्ट इंडिया फाउंडेशन संस्थापक, इंडिया आर्ट गॅलरीचे संचालक आणि खुला आसमान या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे संयोजक मिलिंद साठे (वय 60 ) यांचे शुक्रवारी मध्यरात्रीनंंर अल्पशा आजाराने निधन झाले.

मिलिंद साठे यांची अलीकडच्या काळातील ओळख त्यांच्या चित्रकलाविषयक सामाजिक उपक्रमांमुळे होती. इंडिया आर्ट गॅलरीच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांची प्रदर्शने भरविली. तसेच स्थानिक, युवा, होतकरू चित्रकारांना त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आर्ट इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून मुलांमध्ये कलाविषयक जाणीव आणि दृष्टिकोन वाढावा यासाठी 'खुला आसमान' आणि 'अरमान' हे दोन प्रमुख उपक्रम राबविले.

साठे यांचा 'खुला आसमान' हा मुलांमधल्या चित्रकलेतल्या सर्जकतेला, सकारात्कतेला आणि अभिव्यक्तीला संधी देणारा प्लॅटफॉर्म आहे. 'अरमान' या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विशेष गरजा असलेल्या समाजघटकांचे आयुष्याशी चालू असलेले संघर्ष आणि परिस्थितीला हार न जाता जपलेली सकारात्मकता याबद्दलच्या आश्वासक गोष्टींचा संग्रह आहे.

साठे यांनी आदिवासी आणि दुर्गम भागातली मुले, कॅन्सरपीडित मुले (टाटा कॅन्सर संशोधन केंद्राबरोबर) आणि थॅलासेमिया आजार झालेली मुले (रेड क्रॉसबरोबर) यांच्यासाठी चित्रकलाविषयक आश्वासक उपक्रमांचे आयोजन केले होते. 'सीएसआर वर्ल्ड' या त्यांच्या प्लॅटफॉर्ममार्फत त्यांनी एका बाजूला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि दुसरीकडे चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये समन्वय घालून द्यायचा प्रयत्न केला.

मिलिंद साठे यांचे शिक्षण ज्ञान प्रबोधिनी, फर्ग्युसन महाविद्यालय, दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेज आणि सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या संस्थांमध्ये झाले. लिंक सॉफ्टवेअर आणि न्यू मीडिया व्हेंचर्स या त्यांच्या स्वतःच्या दोन कंपन्यांमार्फत आयटी क्षेत्रात गेली 25 वर्ष उद्योजक म्हणून ते कार्यरत होते. प्रवास, सायकलिंग, फोटोग्राफी, इतिहास आणि संवादमाध्यमे यामध्ये त्यांना सखोल आणि सक्रिय रस होता. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्राची साठे, मुलगा, वडील, बहीण असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement